महाराष्ट्रातील बहुतांश भागातून मान्सून परतला आहे. पावसाने माघार घेताच ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आज मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, राज्यात उन्हाची काहिली आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागातून येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून परतण्याची शक्यता आहे. पाऊस जाताच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. ऑक्टोबर हिटमुळं नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक भागात 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
आज 5 ऑक्टोबर रोजी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई,रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांत यलो अलर्ट दिला आहे. तसंच, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे
मुंबईत रविवारी कमाल तापमान 36.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 2.5 अंशांनी अधिक आहे. त्यामुळं दुपारी मुंबईकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे.
विदर्भात पारा 37 अंशांपार
विदर्भात ऑक्टोबर हिटचा प्रभाव अधिक जाणवत असून अकोला येथे 36.1 अंश तापमानाची नोंद झाली. हे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले. अमरावती 36.4, चंद्रपूर 36.4 वर्धा 36, बुलढाणा 35.2, ब्रह्मपुरी 35.2, नागपूर 35 आणि वाशिम 35 अंश अशा तापमानाची नोंद झाली.
कोकणात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता
यंदा कोकणात पावसाचे प्रमाण असामान होते. उत्तर कोकणात सरासरीच्या आसपास पाऊस झाला असला तरीही दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील काही व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमीच होते. पावसात मोठा खंड निर्माण झाल्याने गेले अनेक दिवस बहुतांश भागांत कोरडे हवामान आहे. ऑक्टोबरआरंभीच कोकणात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण प्रदेशात उष्ण व दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’चा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यात ऑक्टोबर हीटच्या झळा
पावसाळ्याने नुकताच निरोप घेतला असला तरी, आता पुण्यात ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच शहर आणि परिसरातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाल्याने पुणेकर हैराण झाले आहेत.







