मरीन ड्राइव्हवर पादचाऱ्यांसाठी हिरवा सिग्नल असतानाही तो पूर्णपणे दुर्लक्षित करुन लाल सिग्नल ओलांडणाऱ्या टॅक्सी चालकाला ‘पूर्णपणे निष्काळजी’ ठरवत मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने सध्या २४ वर्षांच्या असलेल्या तरुणाला १.१५ कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. २०१८ मध्ये झालेल्या या अपघातात कांदिवलीतील गौतम झा नामक तरुण (जो तेव्हा १६ वर्षांचा विद्यार्थी होता) गंभीर मेंदूच्या दुखापतीला बळी पडला आणि त्याला कायमस्वरुपी दिव्यांगत्व आले.
विमा कंपनीने उपस्थित केलेला ‘सह-निष्काळजीपणा’ (contributory negligence) चा युक्तिवाद फेटाळून लावत मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की, अतिवेगात असलेल्या टॅक्सीने गौतम झा याचा मार्ग अडवला होता. तो त्यावेळी अपघातप्रवण परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या कैवल्यधाम सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगचा वापर करत होता.
टॅक्सीचे सिग्नलकडे पूर्णपणे दुर्लक्ष
न्यायाधिकरणाने सांगितले की, गौतम झाच्या साक्षीतून हे सिद्ध होते की, पादचाऱ्यांसाठी हिरवा सिग्नल असताना तो झेब्रा क्रॉसिंगवरुन जात होता. शुक्रवारी या प्रकरणावर भाष्य करताना सदस्य एम. जी. देशपांडे म्हणाले, “जेव्हा पादचाऱ्यांसाठी हिरवा सिग्नल असतो, तेव्हा टॅक्सीने तो सिग्नल तोडून पुढे येण्याचे कारणच काय? उलट, टॅक्सी चालकाचे हे कृत्य स्पष्ट करते की, त्याने पादचाऱ्यांसाठी असलेल्या हिरव्या सिग्नलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पादचाऱ्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला.”
न्यायाधिकरणाने म्हटले की, “लाल सिग्नल असताना टॅक्सी चालकाने पादचाऱ्यांचा मार्ग अडवण्याचे कोणतेही कारण नव्हते.” मरीन ड्राइव्ह परिसराचा उल्लेख करत न्यायाधिकरणाने नोंदवले की, “मरीन ड्राइव्हवरील कैवल्यधाम समोरील झेब्रा क्रॉसिंग हे अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिथे अनेक पादचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत.”








