Search
Close this search box.

स्टार क्रिकेटपटूचं दिल्लीत निधन, क्रिकेटविश्वात एकच खळबळ; 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झाद्रान याचं निधन झालं आहे. अफगाणिस्तान क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दीर्घ आजारानंतर मंगळवारी नवी दिल्ली येथे त्याने अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) दिली आहे.  तो 38 वर्षांचा होता. त्याने 2009 ते 2020 या काळात अफगाणिस्तानसाठी 44 एकदिवसीय आणि 36 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

 

शापूर झाद्रन याला ‘हीमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस’ (HLH) या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराचे (चौथ्या टप्प्यातील) निदान झाले होते. या आजारामुळे शरीरात तीव्र दाह निर्माण होतो आणि अनेक अवयवांचं नुकसान होऊ शकतं. या आजारावरील उपचारांसाठी तो नवी दिल्लीत होता आणि मे महिन्यापासून अतिदक्षता विभागात (ICU) दाखल होता.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आजारी पडल्यानंतर त्याची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्याला भारतात जाऊन प्रगत उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर रशीद खान आणि एसीबीचे अध्यक्ष मीरवाईस अश्रफ यांच्या मदतीने त्याचा वैद्यकीय व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात आली. 18 जानेवारी रोजी त्याला नवी दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण हा झाद्रानसोबत राहण्यासाठी दुबई आणि दिल्ली दरम्यान वारंवार प्रवास करत होता. रशीद खान आणि अफगाणिस्तानचे इतर अनेक खेळाडू त्याच्या डॉक्टरांच्या आणि कुटुंबीयांच्या संपर्कात होते. सुरुवातीला त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हं दिसत होती. परंतु वारंवार होणारे संसर्ग, डेंग्यू आणि लाल रक्तपेशींच्या संख्येत झालेली मोठी घट यामुळे त्याची प्रकृती खालावली.

एसीबीने शापूर झाद्रनला श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे की, अफगाणिस्तान क्रिकेटची सन्मान, धैर्य आणि अभिमानाने सेवा केली आणि त्याचे योगदान देशाच्या क्रिकेट इतिहासाचा अविभाज्य भाग राहील.

बोर्डाने शापूर झाद्रन अफगाणिस्तानच्या तरुण क्रिकेटपटूंसाठी एक प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे. त्याची लवचिकता, दृढनिश्चय आणि खेळावरील प्रेमामुळे पुढील पिढीला मोठी स्वप्नं पाहण्यास आणि अफगाणिस्तान क्रिकेटच्या भविष्यावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

“अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, माजी सहकारी आणि संपूर्ण अफगाण क्रिकेट विश्वाप्रती आपल्या मनापासूनच्या संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करत आहे. त्याच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून, अफगाणिस्तानच्या जनतेच्या आणि क्रिकेट विश्वाच्या हृदयात त्यांची आठवण सदैव जिवंत राहील,” असं बोर्डाने म्हटलं आहे.

admin
Author: admin

और पढ़ें