पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये वाकड येथील डांगे चौकाजवळील एका निवासी इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन उडी मारून ३३ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह मृत्यूला कवटाळल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. पोलिसांना आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे, त्यामध्ये महिलेने आपल्या आजारपणाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे. तसेच, आपल्या पश्चात मुलाला आपली आठवण येईल, म्हणून त्यालाही सोबत नेत असल्याचे तिने त्यात लिहिले आहे.
राजस्थानचे कुटुंब, दोन वर्षांपासून पुण्यात
मृत व्यक्तींची ओळख एकता मनोज भांगड (वय ३३) आणि तिचा मुलगा माधव मनोज भांगड (वय ६) अशी पटली आहे. ही घटना डांगे चौकाजवळील ‘सिग्नेचर पार्क’ सोसायटीमध्ये सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. वाकड पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला गृहिणी होती, तर तिचे पती येरवडा येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून गेल्या दोन वर्षांपासून या सोसायटीत राहत होते.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आई मुलाला १८ व्या मजल्यावर घेऊन जाताना दिसली. इमारतीच्या अंतर्गत डक्टमधून मोठा आवाज आल्यानंतर रहिवाशांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, महिला आणि तिचा मुलगा मृत अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये संबंधित महिला आपल्या मुलासोबत लिफ्टमधून थेट १८ व्या मजल्यावर जाताना दिसून आली.
आजारपणाला कंटाळून टोकाचं पाऊल
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले की, “सुसाईड नोटमध्ये महिलेने आपल्या आजारपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. तसेच, आपल्या पश्चात मुलाला आपली आठवण येईल, म्हणून त्यालाही सोबत नेत असल्याचे तिने त्यात नमूद केले आहे.”
फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि पंचनामा पूर्ण करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. त्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवण्यात आले.
महिलेच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक तपशील समोर येतील.








