राज्यातील मुसळधार पावसामुळे (Rain) अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी पुराच्या घटनाही घडल्या आहेत. तर, काही ठिकाणी झाडपडी, घर कोसळण्याचे प्रकार समोर आले आहेत, लोणावळा घाटात दरडी कोसळल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यातच, लोणावळा (Lonavala) येथील नॉर्थ पॉइंट आणि थ्री सिक्सटी रिसॉर्ट परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, एसडीओ (SDO) महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मातीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातच, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यातील पर्यटनस्थळी कलम 163 लागू केले आहे. त्यामुळे, पर्यटनस्थळी काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-पुणे कनेक्टींग लिंकवर देखील दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत ती दरड हटविण्याचे काम केले. मात्र, 24 तास येथील वाहतूक बंद झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावरही दरड कोसळली
मुंबई-गोवा महामार्गवरील लोटे येथे वाहतूक पोलीस चौकीसमोर डोंगरावरील दरडीचा भाग कोसळला. मुसळधार पावसामुळे डोंगरातील मोठे दगड, माती आणि झाडे कोसळल्याने भूसखलनाचा धोका वाढला. गोव्याकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद करून दुसऱ्या लेनने सुरू केली आहे. मात्र, दरडी कोसळत असल्याने मातीचा मोठा ढीग रस्त्यावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते.
दरम्यान, शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.








