माजी सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांनी बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांची भेट घेतल्याने आता वादाला तोंड फुटलं आहे. भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते, याचा आपल्याला प्रचंड शॉक बसला आहे. यापुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नयेत अशा शब्दात अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भूषण गवई यांच्यावर टीका केली. श्याम मानव यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भूषण गवई यांच्यावर टीका केली.
देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला (ageshwar Dham) कुटुंबासह भेट दिली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यावरुन आता त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
Shyam Manav On Bhushan Gavai : गवईनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव म्हणाले की, यापूर्वी धीरेंद्र शास्त्री या विकृत बाबाचा दीक्षाभूमीवर सत्कार घेण्यात आला होता. त्यावेळेस मी त्याला विरोध केला होता. भूषण गवई हे रा. सू. गवई यांचे सुपुत्र आहेत. भूषण गवई म्हणतात की ते स्वतः आंबेडकरी विचारांचे आहेत. आंबेडकरी विचारांचं त्यांनी दूध प्यायल्याचा दावा करतात. पण ते जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील तर यापुढे त्यांनी आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचं नाही, तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे. तोंडातून पुन्हा आंबेडकरांचे नावच काढू नका.








