पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात चक्क दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्या आहेत.
या प्रकाराची सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलखोल केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पवित्र धार्मिक स्थळी अशा वस्तू सापडल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Pandharpur Temple Cleanliness Issue : मंदिरातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह
दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येणाऱ्या या सात मजली दर्शन मंडपात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिर परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना घडल्याने स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
BVG Company Vitthal Mandir : कंत्राटदार कंपनीवर संशय
मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी दारू आणि तंबाखूजन्य वस्तू आढळल्याने संबंधित कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
Pandharpur Social Activist Demand : सीसीटीव्ही तपासण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसाट यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दर्शन मंडपातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Pandharpur Devotee Reaction : भाविकांमध्ये संताप
या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. धार्मिक स्थळांची पवित्रता राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.








