राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्याच्या (Pune) शिवाजीनगर भागातील सत्र न्यायालयाजवळ मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या गोळीबार आणि मारहाणीच्या घटनेतील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी, अतिरिक्त मुख्य न्यायाधीश श्रीमती एस डी पंजवानी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये, पुणे पोलिसाकडून (Police) आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने (court) आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागात रक्तरंजित थरार पाहायला मिळाला, येथील न्यायालयासमोरच चक्क 6 जणांच्या टोळक्याने मंदार किवळे याच्यावर आधी गोळीबार केला. गोळीचा नेम चुकल्यानंतर त्यांनी मंदार किवळेचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यात मंदारचे दोन्ही हात तुटले होते. सध्या गंभीर जखमी झालेल्या किवळेवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
सर्व रेकॉर्डवरील आरोपीना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यावर, केवळ एका ठिकाणी राहतात म्हणून सर्वांना आरोपी केले गेले आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला. तर, हल्ल्यावेळी वापरलेले वाहन जप्त केले आहेत, CCTV आणि मोबाईलमध्येही हल्ल्याचे फुटेज आहे, आरोपींनी हत्येचा कट रचला होता, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तसेच, हत्या करण्यासाठी पिस्तूल आणि कोयते कुठून आणले याचा तपास करायचा आहे. वाहने जप्त केली असून अन्य पुरावे गोळा करायचे आहेत. त्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार, आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय.
दरम्यान, आरोपींनी हल्ला केल्यानंतर हम बाप है अशा घोषणा देत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 2025 मध्ये पुण्याच्या कात्रज भागात जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण या तरुणाची हत्या करण्यात आली होती, त्या आरोपींमध्ये किवळेही होता. अटकेतील किवळेला 2 दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. त्यानंतर आरोपींनी हीच संधी साधत किवळेला लक्ष्य केलं. दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत 6 जणांना अटक केली असून आज न्यायालयात हजर केले असता आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच हा संपूर्ण कट रचला होता. तसेच, या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याने इतर आरोपींना सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर झालेला जीवघेणा हल्ला बदल्याच्या भावनेनं केल्याची माहिती समोर आली. 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याची माहिती आहे. शुभमचा भाऊ अक्षय चव्हाणने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून कट रचल्याची माहिती समोर आलीय. जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळेवर पाळत ठेवून हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जखमी किवळेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.








