राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याधीही दिवाळीपूर्वी 4 नोव्हेंबर रोजी दुष्काळ दौऱ्यावर निघाले असता, सोलापुरातूनच शरद पवार (Sharad pawar) थेट रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर, उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या निवासस्थानी दाखल झाले होते. आता, पुन्हा एकदा त्यांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले असावे, असे खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांना बहुधा डिहायड्रेशन (पाण्याचं प्रमाण कमी होणे) झाले असावे, त्यांनी आता थोडा वेग कमी करायला हवा आणि प्रवासही कमी केला पाहिजे. पण, बाबा कोणाचेच ऐकत नाहीत, त्यांना त्यांच्या कामावर खूप जास्त प्रेम आहे. तुमच्या सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, असे स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवले आहे. तसेच, शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देत एकप्रकारे नियमित चेकअपचा हा भाग असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सूचवलं आहे.
दोन दिवस उपचार घेतील – रोहित पवार
आदरणीय पवार साहेब यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुप्रियाताई सध्या प्रत्यक्ष साहेबांना भेटून पुन्हा बैठकीसाठी येत आहेत. सध्या साहेबांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू राहतील. त्यामुळं साहेबांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये, अशी माहिती रोहित पवार यांनी सोशल मीडियातून दिली आहे.
दरम्यान, याच महिन्यात दिवाळीआधी शरद पवार दुष्काळ पाहणीसाठी दौऱ्यावरती होते, त्यादरम्यान त्यांना हवामान बदलामुळे कफ आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांचा दुष्काळ पाहणी दौरा रद्द करण्यात आला, त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर शरद पवार यांना व्हील चेअरवरुन बाहेर आणण्यात आलं. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना हात उचांवून पवार यांनी इशारा केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासोबत ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते.
नरेंद्र मोदींकडून प्रकृतीची विचारपूस
शरद पवार याआधी रुग्णालयात दाखल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच, आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.








