माहिममध्ये पीसी जैन ज्वेलर्सवर (PC Jain Jewellers) झालेल्या गोळीबार (Mumbai Mahim Firing Case) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्वेलर्स मालकाला काही दिवसांपूर्वीच खंडणीसाठी धमकी आली असल्याचे समोर आले आहे. ज्वेलर्स मालकाने त्याला आलेली धमकी ही बिष्णोई गॅंगकडून आल्याचा दावा केला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर पीसी जैन ज्वेलर्सचे मालक भरत मेघराज जैन यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तर 18 ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आणि व्हॉट्सॲप मेसेज केल्याचे देखील भरत मेघराज जैन यांनी केलेल्या तक्रारीतून खुलासा करण्यात आला आहे. (Mumbai Mahim PC Jain Jewellers Firing Case)
दरम्यान, 31 ऑक्टोबरला थेट 10 कोटी रुपये देण्याची मागणी करत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. सुरुवातीचे धमकीचे मेसेज स्पॅम समजून भरत जैन यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र 25 नोव्हेंबर रोजी रात्री 7:30 वाजता दुकानात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांकडून 2 ते 3 राऊंड फायरिंग करण्यात आले. तसेच गोळीबारात दुकानाच्या काचेच्या दरवाजाचे नुकसान झाले. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून वांद्रेच्या दिशेने फरार झाल्याची माहिती जैन यांनी पोलिसांना दिलीय. तर दुकानातील CCTV मध्ये आरोपींची दुचाकी MH 15 AJ 3565 क्रमांकाची कैद झाली असून त्यादिशेने आता पोलीस तपास करत आहे.
Mahim Firing Case: शूटर्सनी ओळख लपवण्यासाठी दुचाकीवर बनावट नंबर प्लेट लावली
दरम्यान, माहिम गोळीबार प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक मोठा खुलासा समोर आला आहे. शूटर्सनी ओळख लपवण्यासाठी दुचाकीवर बनावट नंबर प्लेट लावली होती. दुचाकीचा चेसिस नंबरही पुसून टाकण्यात आला होता, जेणेकरून दुचाकीचा मालक आणि ती कुठून आणली याचा तपास लागणार नाही. गोळीबाराच्या वेळी शूटर्सनी हेल्मेट घातल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार, शूटर्सनी वांद्रे स्टेशनजवळ दुचाकी सोडून पलायन केले. त्यानंतर ट्रेनने बोरिवलीच्या दिशेने प्रवास केल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. सध्या गोळीबार करणाऱ्या शूटर्सचा शोध सुरू असून पोलीस तपास करत आहे.
10 कोटींची खंडणी उकळण्यासाठी कट रचून जीवघेणा हल्ला, BNS आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, दोन्ही आरोपींचे वर्णन तक्रारदाराने पोलिसांना दिले असून पुन्हा समोर आल्यास ओळखू शकणार असल्याचा दावा जैन यांनी केला आहे. 10 कोटींची खंडणी उकळण्यासाठी कट रचून जीवघेणा हल्ला केल्याचा देखील तक्रारीत आरोप करण्यात आला असल्याची माहिती आहे. तर या प्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात BNS आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
दुसरीकडे, पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेच्या प्रकरणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांकडे दोन्ही घटनांवर नाराजी व्यक्त केली असून ‘अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलिस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती आहे.
Mumbai Mahim Firing Eyewitness : माहीम गोळीबार प्रकरणी प्रत्यक्षदर्शीचा जबाब, जॅकेटधारी दुचाकीस्वार
मुंबईतील माहीम येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रत्यक्षदर्शीने महत्त्वाची माहिती दिली आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले असून दोघांनी जॅकेट घातले होते, तसेच गोळीबारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.








