भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा 8 सप्टेंबरच्या रात्री उशिरा मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दिसल्याने चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटपासून काही काळ दूर असलेला हिटमॅन अचानक रुग्णालयात दाखल झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आणि तो क्षणात व्हायरल झाला.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट आणि स्लिपर्समध्ये दिसत आहे. चाहत्यांनी त्याला पाहताच नावाने हाक मारली, पण रोहितने कोणाशीही संवाद साधला नाही आणि तो थेट रुग्णालयाच्या आत गेला. ही दृश्ये पाहून चाहत्यांची चिंता अधिकच वाढली आहे. कारण नेमक्या कोणत्या कारणासाठी तो रुग्णालयात गेला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चाहत्यांमध्ये चर्चांना अधिक उधाण
याआधी काही दिवसांपूर्वीच रोहितने बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट दिली होती. त्यात त्याने यशस्वी कामगिरी करत फिट असल्याचे सिद्ध केले होते. टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर तो काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत तो पुन्हा मैदानावर उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्याचा रुग्णालयात जाण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चांना अधिक उधाण आले आहे.
चाहत्यांमध्ये टेन्शन वाढले
रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचा सर्वात लोकप्रिय खेळाडू असून त्याचे अनेक चाहते आहेत. आता त्याची तब्येत बिघडल्याची शक्यता ऐकताच चाहत्यांमध्ये टेन्शन वाढले आहे. सोशल मीडियावर #RohitSharma हा हॅशटॅग ट्रेंड होत असून हजारो चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या तरी रुग्णालयातील भेटीचं खरं कारण स्पष्ट झालेलं नसल्याने सर्वांचे लक्ष बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटकडून होणाऱ्या अधिकृत अपडेटकडे लागले आहे. पुढील काही तासांत याबाबत मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.









