Search
Close this search box.

सावधान! ऐन सणासुदीत नाशिककरांवर घोंगावतंय नवं संकट, दोन महिन्यात 11 बळी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ऐन सणासुदीच्या काळात नाशिक शहरासह जिल्ह्यावर मोठं संकट घोंगावत आहे. शहरात डेंग्यूपाठोपाठ स्वाईन फ्लूचा कहर वाढला आहे. दोन महिन्यात स्वाइन फ्लूने तब्बल 11 बळी घेतले आहेत. त्यामुळं सर्वसामान्य जनतेने आरोग्याची काळजी घेण्याचे अवाहन केले आहे. दोन आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडणे आणि मृत्यू होणे हे चिंताजनक मानले जाते.

नाशिककरांवर स्वाईन फ्लूचे मोठे संकट ओढावले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत स्वाईन फ्लूमुळं 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या तीन आठवड्यात स्वाईन फ्लूचे 114 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळं बाधितांचा एकूण आकडा 261 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील तीन तर ग्रामीण भागातील आठ जणांचा समावेश आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

अचानक रुग्णसंख्येत वाढ का?

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरात डेंग्यू, मलेरिया आणि तापसदृश्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत होती. त्यातच आता स्वाईन फ्लूनेही डोकं वर काढलं आहे.गणेशोत्सवातील प्रचंड गर्दीमुळे स्वाईन फ्लू बाधितांच्या संख्येत अचानक आणि मोठी वाढ झाली आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये या आजारामुळं पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आणखी सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

स्वाईन फ्लू सोबतच डेंग्यूचाही विळखा

स्वाईन फ्लू सोबतच डेंग्यूचाही विळखा बसला आहे.  शहरातील डेंग्यू रुग्णांची संख्या 147 वर पोहोचली आहे.  स्वाइन फ्लू सोबतच डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूचे 56 रुग्ण आढळले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये 45, तर सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत आणखी 46 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे डेंग्यूबाधितांची एकूण संख्या 147 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे डेंग्यूमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या साथरोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें