Search
Close this search box.

पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळा, महाविद्यालयं, अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने उद्यासाठी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने उद्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील  सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाकडून पालघर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, ठाणे आणि मुंबईला यल्लो अलर्ट दिला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन पालघरमधील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान पालघर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे. पावसाचा हा जोर आषाढी एकादशीपर्यंत कायम राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट 

रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 47.98 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

उत्तर रत्नागिरीत सर्वाधिक पाऊस असून खेडमध्ये 24 तासांत सर्वाधिक 86.71 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दापोली, चिपळूण, राजापूर या तालुक्यांतही 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सरींवर पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जूनपासून आज पर्यंत जिल्ह्यात 46.49 टक्के पाऊस पडला आहे.

धरणांची काय स्थिती?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तानसा धरण पूर्ण भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. भातसा आणि मोडक सागर धरणातील पाणीसाठा 8 ते 12 टक्क्यांनी वाढू शकतो. अपर वैतरणा धरण 12 ते 18 टक्क्यांनी, तर पालघरमधील सूर्य धरण 20 टक्क्यांनी भरण्याची शक्यता आहे.

admin
Author: admin

और पढ़ें