पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून स्वत: पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली आहे. मागील तीन आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मोठी घोषणा केली असून आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मोदी नेमकं काय म्हणाले?
नीट पेपरफुटीवरुन दिल्लीसहीत देशातील वेगवगेळ्या भागांमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असतानाच मोदींनी आज सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन, “देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असं म्हणत एक पोस्ट केली आहे. “आम्ही निर्णय घेतला आहे की, सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केली जातील, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल. आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत,” असं मोदींनी सांगितलं. पुढे बोलताना पंतप्रधान मोदींनी, “विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असंही अधोरेखित केले आहे. “जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल, त्याला सोडले जाणार नाही,” असा शब्दही पंतप्रधानांनी दिला आहे.
आज महाराष्ट्र बंदची हाक
जंतर-मंतर येथे 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पोलिसी कारवाईचा निषेध करण्यासाठी आज बहुजन वंचित आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आहे. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या बंदला काँग्रेससहीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. पुण्यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून महाराष्ट्र बंदला सुरुवात होणार आहे. बंद काळात पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत आणि महाविद्यालयात पाठवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदमध्ये 30 हून अधिक संघटनानी पाठिंबा देऊन सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. हा बंद शांततेत होणारा असून पुण्यातील संभाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
अतिरिक्त डीसीपीविरोधात एफआयआर?
तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार साकेत गोखले यांनी दिल्लीतील अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली. 20 जुलै 2026 रोजी जंतर-मंतर येथे एका महिला आंदोलकावर कानशीलेत लगावल्याप्रकरणी अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.








