मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक इमारतीतील लिफ्ट गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. फ्रॅक्चरग्रस्त, अपंग, अपघातग्रस्त आणि शस्त्रक्रियेनंतर उपचार घेणाऱ्या रुग्णांना जिन्याने वरच्या मजल्यांवर जावे लागत आहे. काही रुग्णांना व्हीलचेअर आणि स्ट्रेचरच्या मदतीने जिन्यांवरून नेले जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पायाला प्लॅस्टर केलेला एक रुग्ण शिड्यांवर बसून खाली उतरतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. (Mumbai news)
लिफ्ट बंद असतानाही रुग्णालय प्रशासन आणि संबंधित इंजिनिअरिंग विभागाकडून दुरुस्तीसाठी ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप होत आहे. लिफ्ट तातडीने सुरू करावी आणि या दिरंगाईला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरुन मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली आहे.
रुग्णांचे हाल सुरूच, रुग्णालय प्रशासन मात्र झोपेत आहे का? मुंबईतील सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या केईएम रुग्णालयाच्या ओपीडी विभागातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद असल्याचे वृत्त अत्यंत संतापजनक आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना उपचारांसाठी जिने चढण्याची वेळ येत असेल, तर यापेक्षा मोठे अपयश कोणते ? रुग्णालयात उपचार घ्यायला येणाऱ्या रुग्णांना आधी जिने चढण्याची शिक्षा का? रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या जीवाची आणि वेदनांची काहीच किंमत नाही का? धक्कादायक बाब म्हणजे केईएम रुग्णालयातील विविध लिफ्टच्या सुरक्षिततेसाठी आणि दुरुस्तीसाठी ६ नोव्हेंबर रोजी निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. मग या समस्या आधीच का सोडवण्यात आल्या नाहीत?, असा सवाल अमेय घोले यांनी उपस्थित केल्या आहेत.
महानगरपालिकेची रुग्णालये ही गोरगरिबांच्या उपचारासाठी आहेत, त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासाठी नाहीत. फक्त लिफ्ट दुरुस्त करून हे प्रकरण संपणार नाही. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, हे निश्चित करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनी स्वतः लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, ही माझी ठाम मागणी आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असेही अमेय घोले यांनी म्हटले आहे.
1. बंद असलेल्या लिफ्ट तातडीने दुरुस्त करून रुग्णांसाठी सुरक्षितपणे सुरू कराव्यात.
2. लिफ्ट किती दिवसांपासून बंद आहेत, याचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा.
3. संबंधित देखभाल कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी.
4. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी!








