Search
Close this search box.

Maharashtra Weather: पावसाने आठवडाभर झोडपलं, पण आता पुन्हा चिंतेचे ढग; महाराष्ट्रातील पाऊस गायब होणार, हवामान खात्याचा ताजा अंदाज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जुलैच्या पहिल्या सात दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील एकूण पाऊस आता सरासरीच्या श्रेणीत आला आहे. या कालावधीत राज्यातील ३६पैकी १८ जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, सात जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त, तर सात जिल्ह्यांमध्ये सरासरी श्रेणीत पाऊस नोंदला गेला. मात्र, आता येत्या आठवड्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात दिवसांमध्ये जमा झालेले पाणी सांभाळून वापरणे अत्यावश्यक ठरणार आहे.

कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील जेऊर, महाबळेश्वर, पुणे, सांगली, सातारा या केंद्रांवर सात जुलैच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत आत्ताच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला आहे. कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस नोंदला गेला. विदर्भात गोंदिया येथे अतिरिक्त पाऊस नोंदला गेला. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसाची तूट आहे, तर मोजक्या जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीत पडला आहे.

उत्तर कोकणात गुरुवारी, नऊ जुलैला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. ११ जुलैपर्यंत हलक्या सरींची शक्यता असेल. दक्षिण कोकणात नऊ जुलैपासून रायगड जिल्ह्यात हलक्या सरी असतील, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात घाट परिसर वगळता इतरत्र फारसा पाऊस नाही. बुधवारपासून या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचीच शक्यता आहे. मराठवाड्यातही ११ जुलैपर्यंत हलक्या सरींचा अंदाज असून, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. मात्र, पावसाचा जोर हलका ते मध्यम स्वरूपाचाच असेल.

‘मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात १० ते १९ जुलैपर्यंतच्या दहा दिवसांत पावसाची केवळ उघडीप असेल,’ असे हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.

दरम्यान, अरबी समुद्रातील किनारपट्टीला समांतर असलेल्या हवेच्या कमी दाबाची दक्षिणोत्तर द्रोणीय स्थिती उथळ होईल. बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र उत्तर आणि वायव्येकडे मार्गक्रमण करत येत्या दोन दिवसांत दक्षिण राजस्थानमध्ये विरळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. म्हणूनच हलक्या पावसाची शक्यता असेल, असे खुळे यांनी स्पष्ट केले.

admin
Author: admin

और पढ़ें