आपल्या लाडक्या गणरायाचं उत्साहात स्वागत केल्यानंतर, आज 11 दिवसांनी सर्व गणेशभक्तांकडून गणपती बाप्पाला जड मनाने निरोप दिला जात आहे. मुंबई, पुण्यासह सर्व राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह दिसत आहे. दरम्यान कोल्हापुरात एक दुर्देवी घटना घडली आहे. विसर्जनादरम्यान 21 फूट उंच मूर्ती कोसळली आहे. सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र गणरायाला अखेरचा निरोप देतानाच ही घटना घडल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी आणि दु:ख आहे.
कोलहापुरातील वाय. पी. पोवार नगर मंडळाने यावेळी 21 फुटी उंच भव्य मूर्ती साकारली होती. ही बॅलेन्सिंग गणेशमूर्ती होती. एका पायावर उभी असणारी ही मूर्ती पुढील बाजूला झुकलेली होती. ट्रॉलीमधून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेली जात होती. गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यासाठी नेलं जात असताना गोखले कॉलेज चौकात ती कोसळली. सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. मिळालेलेल्या एका विद्युत तारेचा स्पर्श मूर्तीला झाल्यानंतर ती कोसळली.
मूर्ती कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी काही अनुचित घडणार नाही याची काळजी घेत गर्दी नियंत्रणात आणली. तसंच तात्काळ मदतकार्य सुरू केलं.
दुर्घटनेनंतर गणेशमंडळाने महावितरणवर आरोप केली आहे. विसर्जन मार्गातील वायर, झाडाच्या फांद्या हटवण्यासंदर्भात विनंती केल्यानंतरही त्याची पूर्तता न झाल्याने हा प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र महावितरणने हा आरोप फेटाळला आहे.
मुंबईतील भुलेश्वलरची पुनरावृत्ती
मुंबईतील प्रसिद्ध ‘भुलेश्वरचा राजा’ गणपतीची 22 फूट उंच मूर्ती 22 ऑगस्ट 2026 रोजी आगमन सोहळ्यादरम्यान अचानक कोसळली. या दुर्दैवी अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले.
22 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 ते 10 च्या सुमारास दक्षिण मुंबईतील भुलेश्वर भागातील जय आंबे चौकात ‘भुलेश्वरचा राजा’ मूर्तीचा आगमन सोहळा सुरू होता. मूर्ती भायखळ्यातील कार्यशाळेतून मंडपाकडे आणली जात असताना, मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर ती अचानक असंतुलित होऊन भाविकांवर कोसळली.
धारावी आणि मालाडमध्येही मूर्ती कोसळली
याशिवाय कुर्ला आणि मालाडमध्येही गणेशमूर्ती कोसळल्याची घटना घडली होती. कुर्ला येथील ‘प्रेम नगरचा महाराजा’ मूर्ती 8 सप्टेंबर ला कोसळली होती. प्रेम नगर मित्र मंडळ’ ची 15 फूट उंच असलेली गणेशमूर्ती ट्रॉलीवरून मंडपाकडे नेली जात होती. शीतल तलावाजवळ अचानक मूर्तीचा तोल गेला आणि ती रस्त्यावर कोसळली. घटनेत 3 कार्यकर्ते जखमी झाले. खराब स्पीडब्रेकर आणि खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळल्याचा आरोप करण्यात आला.
मालाड पश्चिम येथील कांचपाडा परिसरात 14 सप्टेंबर 2026 रोजी आगमन मिरवणुकीदरम्यान 17 फुटांची गणेशमूर्ती कोसळल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.






