Search
Close this search box.

Mumbai Crime: मुंबईतील हायप्रोफाइल इमारतीत फ्लॅटमधून उग्र वास; पोलिस तपासात गूढ उकललं, मैत्रिणीसह तरुणाचा भलताच ‘उद्योग’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील ‘यास्मीन टॉवर’ या २३ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर ड्रग्जची प्रयोगशाळा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या इमारतीमधील फ्लॅटमध्ये छापा टाकून एका बांगलादेशी महिलेसह तिघांना अटक केली आहे.

शोएब मन्सुरी (३१), सुफियान मन्सुरी (२८) आणि मामुनी सरकार (२७) अशी आरोपींची नावे आहेत. या फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज तयार करून बाजारात विक्री केली जात होती. या फ्लॅटमधून ५१ कोटी रुपयांचा कच्चा माल, एमडी ड्रग्ज तसेच पिस्तुल आणि १९ काडतुसांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. फ्लॅटच्या स्वयंपाकगृहामध्ये प्रयोगशाळेप्रमाणे युनिट उभारून एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याचे आढळले.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे, सहायक निरीक्षक उल्हास खोलम यांचे पथक ड्रग्जविरोधी कारवाई करीत असताना त्यांना आग्रीपाडा येथे एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी जगदाळे यांच्या पथकाने ‘यास्मीन टॉवर’मध्ये छापा टाकला. या फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल तसेच इतर पदार्थ सापडले. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोएब याच्यासह त्याची मैत्रीण मामुनी आणि सुफियान यांना पोलिसांनी अटक केली.

ड्रग्जसाठी भाड्याने घर

शोएब आणि त्याचे साथीदार हे दक्षिण मुंबईतील नळ बाजार तसेच परिसरातील आहेत. ड्रग्ज तयार करण्यासाठी त्यांनी खास भाड्याने फ्लॅट घेतला होता. सुमारे ४५ हजार रुपये दर महिना भाडे दिले जात होते. फ्लॅट मालकाने याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात दिली होती का, याबाबतची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एसी, धूप आणि कापूर

एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल आणि इतर पदार्थांचा वास उग्र असून, त्याच्या संपर्कात आल्यास डोळ्यांनाही त्रास होतो. ‘यास्मीन टॉवर’ ही रहिवाशी वस्तीची इमारत असल्याने फ्लॅटबाहेर कुणाला वास जाऊ नये, यासाठी हे तिघे कायम एसी सुरू ठेवत. उग्र वास दरवळू नये, यासाठी फ्लॅटमध्ये धूप आणि कापराचा धूर केला जात असल्याचे सांगितले जाते.

दबदब्यासाठी शस्त्रेही बाळगली

शोएब याच्या विरोधात सोनसाखळी चोरी, जबरी चोरी तसेच इतर असे २१ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ड्रग्जची निर्मिती आणि विक्री करताना आपला दबदबा राहावा, यासाठी त्यांनी पिस्तूल आणि काडतुसे बाळगली होती. शस्त्र आणि काडतुसे कुठून आणली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

admin
Author: admin

और पढ़ें