मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेची सरशी झाल्यानंतर मुंबईतील राजकारण आणखीनच रंजक झाले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी ठाकरे गटाचे दोन नगरसेवक आणि मनसेचे 5 नगरसेवक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर आता मुंबईच्या (Mumbai News) राजकारणातही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या वक्तव्याने या सगळ्या चर्चांना आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मदत करण्याचे आवाहन केले आहे. (Mumbai Mayor Election 2026)
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्यावर्षी त्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल. एकनाथ शिंदे यांना मी आवाहन करतो की त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देऊन शिवसेनेचा महापौर मुंबईत बसवण्यासाठी मदत करावी, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय शक्यता उदयाला आल्या असून राजकीय वर्तुळात याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे.
माझ्या मनात प्रचंड दुःख आहे की, हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि यावर्षी मुंबई महापालिकेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर बसणार नाही. यासारखे दुसरे दुःख नाही. जे कोणी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातो असं सांगतात, वारसदार आहे म्हणून सांगतात त्यांना मी विनंती करतो, हे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. इथेच तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेबांसमोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? तुम्ही बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का? जर श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.
मी एकनाथ शिंदे यांना आवाहनवजा विनंती करतो, तुम्ही भाजपला सांगितलं पाहिजे की, केंद्रामध्ये तुमच्या सरकारला पाठिंबा दिला, राज्यांमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या सरकारमध्ये आहोत. पण हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू. एकनाथ शिंदे यांनी हे सांगण्याचे धाडस दाखवलं पाहिजे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. तुमच्या ठिकाणी भास्कर जाधव असता तर हे धाडस दाखवले असते. हा पाठिंबा उद्धव ठाकरे घेतील नाही घेतील हा दुसरा भाग, पण एकनाथ शिंदेने पाठिंबा द्यायला पाहिजे, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी तुम्ही तुमचा मान-सन्मान, गर्व, अहंकार, अधिकार सगळं बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवण्यासाठी तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे. ते बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथ शिंदे यांना दातृत्व दाखवावा लागेल. तुम्ही भाजपसोबत जाण्यासाठी शिवसेना तोडून मोडून घेऊन गेलात म्हणजे तुम्ही शिवसेनेचे मालक होऊ शकत नाहीत, अशी टिप्पणी भास्कर जाधव यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही महापौर पदाबाबत सूचक वक्तव्य केले होते. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर बसेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असल्याचीही माहिती समोर आली होती. परंतु, भाजपचे नेते महायुतीचा महापौर होण्याच्या वक्तव्यावर ठाम आहेत. कालच मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत निघाली होती. त्यामध्ये मुंबई आणि पुण्याचं महापौरपद खुल्या वर्गातल्या महिलेसाठी राखीव झाले होते. तर छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळाचं महापौरपदही खुल्या वर्गातल्या महिलांसाठी आरक्षित झाले होते. ठाणे, जालना आणि लातूरमध्ये अनुसूचित जातींसाठी महापौरपद राखीव ठेवलं आहे. केवळ कल्याण-डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातींसाठी महापौरपद राखीव झाले होते. मुंबईचे महापौर अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असते तर ठाकरे गटाला महापौरपद मिळण्याची आशा होती. मात्र, तसे न घडल्यामुळे ठाकरे गटाचा महापौर होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. मात्र, आता भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे मुंबईत वेगळेच राजकीय समीकरण आकाराला येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Mumbai News: मुंबई महापालिकेतील पक्षनिहाय नगरसेवकांची संख्या-(BMC Election Result 2026)
भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
एनसीपी – 3
एसपी – 2
एनसीपी शप – 1
————-
एकूण- 227








