राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या सुनावणीत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्याने आज खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik Court) हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत केली असून, उद्या त्याला पुन्हा पाचव्या गुन्ह्यात हजर केले जाणार आहे.
Ashok Kharat Court Hearing: व्हीसीद्वारे झाली सुनावणी
सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सुरुवातीला न्यायाधीशांनी त्याचे नाव विचारून ओळख पटवून घेतली. सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर राहून चौथ्या गुन्ह्यातील तपासाचा प्रगती अहवाल सादर केला. मागील पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत खरातची कसून चौकशी करण्यात आली असून, त्याच्या मालमत्तांची ‘ईडी’ (ED) मार्फतही तपासणी करण्यात आली आहे.
Ashok Kharat Court Hearing: पाचव्या गुन्ह्यात ताब्यासाठी पोलिसांची हालचाल
चौथ्या गुन्ह्यातील तपास पूर्ण झाल्याने पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी केली. त्याचवेळी, अशोक खरातवर दाखल असलेल्या पाचव्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी सरकारी पक्षाने न्यायालयाकडे विनंती केली आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) दाखल केले जाणार आहे.
Ashok Kharat Court Hearing: उद्या पुन्हा न्यायालयासमोर हजेरी
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या पुन्हा खरातला पाचव्या गुन्ह्याअंतर्गत न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी ‘एसआयटी’ (SIT) त्याला स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. खरातवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल असल्याने प्रत्येक गुन्ह्यात सखोल तपास करण्यासाठी पोलिसांकडून ही ‘वर्ग’ करण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
Ashok Kharat Crime News: अशोक खरातच्या अटकेला एक महिना पूर्ण, वाचा घटनाक्रम
17 मार्च : रात्री अकरा वाजता भोंदू अशोक खरातला अटक.
18 मार्च: भोंदू अशोक खरातला नाशिक न्यायालयात केले हजर; सात दिवसांची पोलीस कोठडी.
19 मार्च : भोंदू अशोक खराच्या फोकस कार्यालयावर छापा.
20 मार्च: विशेष तपास पथकाकडे प्रकरण वर्ग.
21 मार्च: महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा आयोगाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा.
22 मार्च : तीन महिलांच्या तक्रारीनंतर खरात वर गुन्हे दाखल.
23 मार्च: न्यायालयात पुन्हा सुनावणी साठी केले हजर
24 मार्च: नाशिक पोलीस आयुक्त सह पथकाचे विधिमंडळात अभिनंदन / निवेदन.
25 मार्च: धार्मिक भावना दुखावणे आणि, अमली पदार्थांचा वापर करून महिलांवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हे वाढवले.
26 मार्च: पाच कोटी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.SIT कडून पुरावे जप्त.
27 मार्च: भोंदू अशोक खरातचे ओकस कार्यालय सील.
28 मार्च: नेवासातील कापड व्यावसायिकाला खोट्या अंगठ्या दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
30 मार्च: न्यायलात हजर आणि तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी.
31 मार्च: कार्यालयासह निवासस्थानी झडती, कागदपत्र हस्तगत.
1 एप्रिल: मुलगा हर्षवर्धन ताब्यात मात्र रात्री उशिरा चौकशी करून सोडले.
2 एप्रिल: ऑफिस बॉय नेच धडा शिकवल्याचे निष्पन्न, प्रकरणाची व्याप्ती वाढली.
3 एप्रिल: मरणाची भीती दाखवल्याप्रकरणी मिरगावची जमीन लुटल्याचे उघडकीस.
4 एप्रिल: पहिल्यांदा अशोक खरातला vc द्वारे न्यायालयात केले हजर ( पुन्हा पोलीस कोठडी)
8 एप्रिल: आठ महिला तक्रारी दाखल, तपासता महत्त्वाचे पुरावे SIT च्या हाती लागले.
13 एप्रिल: नाशिक, पुणे आणि शिर्डी सह 11 ठिकाणावर एकाच वेळी ED चे छापेमारी.
15 एप्रिल: गरोदर महिलेवर अत्याचार आणि मुलगा होईल असा दावा केल्याप्रकरणी चौथ्या गुन्ह्यात 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी.
17 एप्रिल: ED कडून अशोक खरातच्या ओकस कार्यालयामध्ये झाडाझडती, शिवनीका संस्थानमध्ये असलेले उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळकेचा अपघाती मृत्यू.
18 एप्रिल: न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार.
Ashok Kharat Crime News: खरात प्रकरणी तपासातील महत्त्वाच्या आणि धक्कादायक बाबी.
– भक्तांना घाबरवण्यासाठी वीस फुटाचा नाग रिमोट कंट्रोल ने फिरवत असल्याचा समोर.
– अशोक खरात भक्तांना फसवण्यासाठी दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसह इतर वस्तूंचा वापर करून चमत्काराचा बनाव करत असल्याचा उघड.
– अशोक खरातचे अनेक बडे नेते आणि अधिकाऱ्यांचे जवळचे संबंध असल्याचा उघड आणि त्या संदर्भातील काही फोटो व्हायरल.
– अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू.
– अशोक खरातच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून पाचशे कोटीपेक्षा जास्त आकडा वाढण्याची शक्यता.








