सामान्यांपासून ते अगदी आलिशान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांना विमान प्रवासाची अविरत सेवा देणाऱ्या आणि अनेकांची पसंती मिळवणाऱ्या इंडिगो (Indigo) एअरलाईन्सला सध्या मात्र अनेक दुषणांचा सामना करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून या कंपनीकडून सातत्यानं शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आली आणि गुरुवारी उड्डाणं रद्द करण्याचा नकोसा विक्रम कंपनीनं रचला. कारण, 4 डिसेंबर 2025 रोजी कंपनीची तब्बल 550 उड्डाणं रद्द करण्यात आली. ज्यामध्ये 191 दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद मार्गांवरील उड्डाणं होती.
कंपनीनं अखेर दिली प्रतिक्रिया…
सलग दोन दिवस सुरू असणाऱ्या या अभूतपूर्व गोंधळामुळं प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि कंपनीप्रती येणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहता अखेर Indigo कडून या परिस्थितीवर भाष्य करत पहिली प्रतिक्रिया जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये नेमकं काय आणि कुठं बिनसलं याची माहिती देत संपनीनं बरीच माहिती स्पष्टपणे दिली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये अनेक अडचणी आल्या असून यासाठी ग्राहक आणि इंडस्ट्री स्टेकहोल्डरप्रती दिलगिरी व्यक्त करण्यात आली. इंडिगोची विविधं पथकं MOCA, DGCA, BCAS, AAI आणि एअरपोर्ट ऑपरेटर्सच्या मदतीनं ही स्थिती पूर्ववत करण्यासाठी पूर्ण कसोशीनं प्रयत्न करत आहेत. जेणेकरून विमानप्रवासामध्य़े होणारी दिरंगाई आणि वेळेचा फरक कमी करता येईल.
कंपनीकडून विमान प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन…
इंडिगोनं सोशल मीडिया पोस्ट करत दिलेल्या माहितीमध्ये विमान प्रवाशांना आणि इंडिगोची सेवा घेणाऱ्यांसाठी आपण वेळोवेळी निर्धारित वेळेतील फ्लाईट आणि त्यात कोणताही बदल होत असल्याच त्याची रितसर माहिती देत असल्याचं स्पष्ट करत विमानतळावर पोहोचण्याआधी विमानासंदर्भातील ताज्या घाडमोडींची माहिती मिळवावी असं आवाहन केलं आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रास आणि अडचणींची आपल्याला पूर्ण कल्पना असून, लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंडिगो प्रयत्न करत असल्याची हमीसुद्धा इथं देण्यात आली.
उड्डाणं रद्द होण्याची कारणं द्या…. DGCA नं मागितलं स्पष्टीकरण
भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सला मागील काही दिवसांपासून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असून, नोव्हेंबर महिन्यातही 1232 उड्डाणं रद्द झाली, तर कैक उड्डाणांना उशीर झाला. सातत्यानं कार्यवाहीमध्ये येणारा उतरता क्रम नेमका का सुरू आहे, याची विचारणा आता डायरेक्टरेट जनरल ऑफ सिविल एविएशन (DGCA) नं केली असून, त्यासंदर्भात तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तेव्हा आता या संकटातून इंडिगो एअरलाईन्स कशी तरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.









