विकी कौशल (Vicky Kaushal), अक्षय खन्ना (Akshay Khanna) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं. काही वेळातच ट्रेलरवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. पण, सगळीकडून उदो उदो सुरू असतानाच अखेर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाच. चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. आता याचप्रकरणी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी चित्रपटाबाबतच्या कॉन्ट्रोवर्सीबाबत राज ठाकरेंचा सल्ला घेतल्याचं सांगितलं. तसेच, ज्या लेझीम खेळतानाच्या सीनवरुन वाद सुरू आहे, तो डिलीट करणार असल्याचंही दिग्दर्शकांनी सांगितलं.
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला आगामी ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. पण, रिलीजपूर्वीच कॉन्ट्रोवर्सीत अडकल्यामुळे आता चित्रपटाची रिलीज डेटही पुढे जाण्याची शक्यता आहे. अशातच आता यावर चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी ‘राज’मार्ग निवडला असून थेट शिवतीर्थावर धाव घेतली आहे. ‘छावा’वरुन निर्माण झालेल्या कॉन्ट्रोवर्सीवर तोडगा काढण्यासाठी दिग्दर्शकांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
‘तो’ सीन डिलीट करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की, “आज राज ठाकरेंची भेट त्यांचा सल्ला घेण्यासाठी होती. त्यांच वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास ज्ञात आहे. त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरही खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा? हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणि याच चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्यात. ते बदल आम्ही करणार आहोत. तसेच, ज्या महाराजांच्या लेझीम खेळणाऱ्या सीनवरुन वाद सुरू आहे, तो आम्ही डिलीट करणार आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.”
“ज्या सीनवरुन वाद निर्माण झालाय, तो आम्ही डिलीट करणार. राज ठाकरेंनीही तोच सल्ला दिलाय. त्यामागे कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण जर कुणाला वाटत असेल, आमचे राजे असे लेझीम खेळत नसतील, तर आम्ही तो सीन चित्रपटातून काढून टाकणार. कारण तो फिल्मचा खूप मोठा भाग नाहीये, एक छोटासा सीन आहे. त्यामुळे तो आम्ही काढून टाकणार.”, असं दिग्दर्शक म्हणाले
“आमची संपूर्ण टीम यावर गेली चार वर्ष रिसर्च करतेय. हा सिनेमा बनवण्यामागचा उद्देश एकच होता की, छत्रपती संभाजी महाराज काय होते? हे संपूर्ण जगाला कळावं, ती व्यक्ती काय होती, किती प्रचंड मोठा योद्धा होता, राजा होता… हे संपूर्ण जगाला कळावं, पण एखाद, दोन गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील, तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही.”, असं दिग्दर्शक उतेकर म्हणाले.
संभाजी महाराज कधी लेझीम खेळले नसतील का?
“हा संपूर्ण चित्रपट शिवाजी सामंतांच्या ‘छावा’ कादंबरीवर आधारित आहे. म्हणजे, इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहे, त्यामुळे नेमकं काय करायचं, यासाठी आम्ही ‘छावा’ कादंबरीचे ऑफिशिअल राईट्स विकत घेतले. ‘छावा’ कादंबरीत लिहिलं आहे की, छत्रपती संभाजी महाराज होळीचा उत्सव साजरा करायचे, होळीतून नारळ काढून खायचे. लेझीम आपला पारंपरिक खेळ आहे. असं नाही की, त्यामध्ये कुठलेही आजचे डान्स स्टेप्स नाहीत. असं काही महाराजांचं चित्रण केलेलं नाही की, ते पाहून आपल्याला लाज वाटावी. संभाजी महाराज कधी लेझीम खेळले नसतील का? कारण ते 20 वर्षांचे होते फक्त. जेव्हा महाराजांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला, ते जिंकलं त्यानंतर ते रायगडावर आले, त्यावेळी एक 20 वर्षांचा राजा खेळलाही असेल लेझीम… त्यात गैर काय असं मला वाटतं… पण शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील, तर तो चित्रपटापेक्षा किंवा महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे तो आम्ही नक्की डिलीट करू.”, असं दिग्दर्शक म्हणाले.
राज ठाकरेंसाठी विशेष स्क्रीनिंग
मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले की, “छावा चित्रपटासंदर्भात ज्या काही चर्चा सुरू होत्या, त्या सगळ्यांबाबत राज ठाकरे यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या सोबत चर्चा केली. लेझीमच्या सीनवर जो आक्षेप घेण्यात आला आहे, तो सीन आता या चित्रपटातून काढून टाकला जाणार आहे. 14 फेब्रुवारीला चित्रपट रिलीज होण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी स्क्रीनिंग ठेवण्यात येणार आहे, राज ठाकरे यांना हा चित्रपट दाखवला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
‘छावा’मधल्या कोणत्या दृश्यांवर आक्षेप?
आगामी ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेल नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधील एका दृश्यात अभिनेता विक्की कौशल लेझीम खेळताना दिसून आला. हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. काहींनी आक्षेप घेतला, तर यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही समावेश होता. लेझीमचा हा सीन हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली. त्यानंतर आता दिग्दर्शक राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
‘छावा’ चित्रपटातील लेझीमच्या दृश्यावरून सध्या नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. एक गट समर्थन करतोय, तर दुसऱ्या गटाला हे दृश्य खटकतंय. लेझीमचं दृश्य अजिबात आक्षेपार्ह वाटत नाही. महाराजांची किर्ती सर्वत्र चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचत असेल तर त्यात आक्षेप का घ्यावा, असं एका गटाचं म्हणणं आहे. तर, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला अशा पद्धतीने लेझीम खेळताना दाखवू नये, असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे.
