राज्यामध्ये सुरु असलेली मराठा आरक्षणाची मागणी, बिहारमध्ये वाढवण्यात आलेला आरक्षणाचा कोटा आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एकेकाळी देशाला रोजगार पुरवणारा महाराष्ट्रच दुबळा होत असल्याने आरक्षणाची मागणी जोर धरत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच मागील 10 वर्षांमध्ये आरक्षणाची मागणी वाढवण्याचं मूळ कारण हे वाढती बेरोजगारी असून सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने रोजगार वाढवण्यासाठी काहीही केलेलं नाही असा ठाकरे गटाच्या टीकेचा सूर आहे.
गेल्या 10 वर्षात आरक्षणाचा भडका उडालाय
“बिहारमध्ये 75 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून पेटलेल्या महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न पडला आहे. बिहारात तामीळनाडूप्रमाणे आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 65 टक्के झाली. त्यात आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देऊन एकूण आरक्षण 75 टक्के झाले. बिहारच्या नव‘मंडल’ नीतीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? महाराष्ट्रात ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ वगैरे नेत्यांनी विरोध केला, पण आरक्षणाचा ‘कोटा’ वाढविण्यास त्यांचा विरोध नाही. याचा अर्थ जे बिहारने केले तेच महाराष्ट्राला करावे लागेल. जातीच्या आधारावर आरक्षणाची आग देशभरातच लागली आहे व गेल्या दहा वर्षांत हा भडका जरा जास्तच उडाला. याचे मूळ देशात वाढलेल्या बेरोजगारीत आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
शेती करणाऱ्यांत खदखद
“मोदी यांच्या काळात जवळ जवळ सर्वच सार्वजनिक उपक्रम बंद करून खासगीकरण करण्यात आले. यापैकी बहुसंख्य सार्वजनिक उपक्रमांची मालकी आता भाजपकडे म्हणजे गौतम अदानी यांच्याकडे आहे. हे असे केल्यामुळे सरकारातील हजारो नोकऱ्या आपण गमावल्या. सर्वत्र कंत्राटी पद्धतीच्या नोकरभरतीचे वारे वाहू लागले. त्या भरतीतून सैन्य आणि पोलीस दलही सुटले नाही. शेती हा देखील पोटापाण्याचा उद्योग राहिलेला नाही. लहरी निसर्गामुळे ते जोखमीचे काम झाले आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेला मोठा समाज, त्यांची पुढील पिढी शहराकडे येऊन रोजगार शोधू लागली. यात कालपर्यंत गावात वतनदार-जमीनदार असलेल्यांची मुले आहेत. पिढ्यान्पिढ्यांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्याने एक-दोन एकरांवर गुजराण होणे कठीण झाले. त्यात कर्ज, निसर्गाचे संकट यामुळे शेती करणाऱ्यांत खदखद आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.








