Search
Close this search box.

त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने बंद होणार? भाविकांमध्ये चर्चेला उधाण; अंतिम निर्णय कुंभमेळा प्राधिकरणाच्या हाती!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कुंभमेळ्याचे पहिल्या शाही स्नानाला अवघे आठ महिने उरले आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर येथे विविध विकासकामांना वेग देण्यात येत आहे. मात्र, याच विकासकामांमुळे आता भाविकांच्या दर्शनावर मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दर्शनपथाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर तब्बल अडीच महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) केली आहे. या प्रस्तावामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून, मंदिर बंद ठेवण्याचा अंतिम निर्णय आता नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या भूमिकेवर अवलंबून आहे.

दर्शनपथाच्या कामासाठी मंदिर बंद ठेवण्याचा प्रस्ताव :

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात दर्शनपथाचे काम हाती घेण्यात आले आहे. मंदिरातील रोजची भाविकांची गर्दी बघता काम संथ गतीने सुरू आहे.  हे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी मंदिरातील नियमित दर्शन, सशुल्क दर्शन आणि विशेष दर्शन सलग अडीच महिने बंद ठवावे आणि या कालावधीत मंदिरातील परंपरागत नित्यपूजा सुरू राहावी, यासाठी देवस्थानने नियुक्त केलेल्या पुरोहितांनाच सुरक्षित मार्गाने मंदिरात प्रवेश देण्याचा प्रस्ताव एमएसआयडीसीने केला आहे.

 

देवस्थान ट्रस्टची सावध भूमिका; निर्णय प्राधिकरणाने घ्यावा!

एमएसआयडीसीच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. देवस्थान ट्रस्टने यापूर्वी कधीही भाविकांसाठी मंदिर बंद ठेवलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा अधिकार देवस्थानला नसल्याची भूमिका विश्वस्तांनी मांडली आहे. त्यामुळे या संवेदनशील विषयावर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण किंवा संबंधित प्रशासनाने घ्यावी, असे देवस्थान ट्रस्टने सूचित केले आहे.

 कुंभमेळा प्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष : 

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला कुंभमेळ्याचे नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी करण्याचे वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत. विशेषतः वाहतूक व्यवस्था, भाविकांची गर्दी नियंत्रित करणे, कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राधिकरणाला निर्देश देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्याबाबत प्राधिकरणाने लेखी निर्देश दिल्यास त्याची अंमलबजावणी देवस्थान ट्रस्टला करावी लागणार आहे.

एकीकडे आठ महिन्यात विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान, तर दुसरीकडे भाविकांच्या धार्मिक भावना आणि दर्शनाचा अधिकार, अशा दुहेरी कात्रीत प्रशासन सापडले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने बंद ठेवण्याबाबत काय निर्णय घेत, याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें