पुण्यात बुधवारी (ता 25) शिवाजीनगर कोर्टासमोर झालेल्या मंदार किवळे हल्ला प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना अटक केला आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी (दि. 26) आणखी एका आरोपीला कडेठाण (ता. दौंड) येथून अटक केली. प्रथमेश दीपक येणपुरे (वय 19, रा. कात्रज, मूळ पाबे, ता. वेल्हा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आठ झाली आहे. दरम्यान, भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंदार किवळे याच्या हत्येची चव्हाण कुटुंबियांच्या नातलगांनी 50 हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अक्षय सुभाष चव्हाण (वय 20), अमोल रामचंद्र चव्हाण (वय 48) स्वप्नील बाजीराव गवळी (वय 28), ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय 18), सूरज साधू मळेकर (वय 22), सत्यम सदाशिव मोरे (वय 25) आणि प्रथमेश दीपक येणपुरे (वय 19) यांना अटक करण्यात आली आहे. तर अर्थव सोपान मारणे (वय 19) हा येरवडा कारागृहात असून, त्याच्यासह एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले आहे.
पोलिस तपासानुसार, 20 एप्रिल 2025 रोजी कात्रजमधील संतोषनगर येथे अर्ध्या गुंठ्याच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणात मंदार किवळे सहभागी होता. त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने अक्षय चव्हाण याने मंदारचा खून करण्याचे नियोजन केले. यासाठी मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर आरोपीच्या घरी बैठक घेऊन हल्ल्याची आखणी केली. पिस्तूलातून गोळी झाडल्यानंतर कोयत्याने वार करून मंदारला ठार मारण्याचे नियोजन होते. मात्र, हल्ल्यावेळी पिस्तूलातून झाडलेली गोळीचे लक्ष्य चुकल्याने आरोपींनी मंदारवर कोयत्याने वार केल्याचे तपासात समोर आले आहे. तर मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी करून हत्येचे नियोजन करण्यात आले होते, घरातच आखला त्याच्या हल्ल्याचा कट रचला होता.
भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली होती. मध्यप्रदेशातून ते पिस्तूल आणले होते. आधी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या नंतर कोयत्याने वार करून हत्या करायची असं ठरलं होतं. तर आरोपी अक्षय चव्हाण याच्या घरीच खुनाचं प्लॅनिंग ठरलं अशी माहिती समोर आली आहे. मात्र हल्ल्यावेळी सुटलेली गोळी चुकली आणि मंदार किवलेला वेळेत उपचार मिळाल्यामुळे तो बचावला. आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे, तर एक अल्पवयीन ताब्यात आहे. मध्यप्रदेश मधील उमरटीमधून ओंकार उर्फ बब्या पवार यांने पिस्तूल आणल्या होत्या. 25 हजाराला एक पिस्तूल आणल्याची माहिती आहे. तर बब्या पवार हा शुभम चव्हाणचा बेस्ट फ्रेंड होता.
अक्षय चव्हाण (20)
अमोल चव्हाण (48)
स्वप्निल गवळी (28)
ओंकार उर्फ बब्या पवार (18)
सुरज मळेकर (22)
सत्यम मोरे (25)
प्रथमेश येनपुरे (19)
Mandar Kiwale Case: संतोषनगर परिसरातील शुभम चव्हाण प्रकरण नेमकं काय?
कात्रजमधील संतोषनगर परिसरातील दोन गुंठे जमिनीतील अर्ध्या गुंठ्याच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर आता टोळीयुद्धात झाले आहे. याच जागेच्या वादातून शुभम चव्हाण याचा खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठीच काल (बुधवारी, ता 25) शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर खुनी हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे, जागेच्या वादातून सुरू झालेला वाद आता एकमेकांना संपवण्यापर्यंत पोहोचला आहे.
2025 मध्ये पुण्याच्या कात्रज भागात शुभम चव्हाण (Shubham Chavan Case) या तरुणाचा खून करण्यात आला होता. मालमत्तेच्या वादातून लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून शुभम चव्हाण याचा खून करण्यात आल्या प्रकरणी चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली होती. शुभम चव्हाण हा कात्रज भागातील संतोष नगर येथील रहिवासी होता. तसेच त्याचे त्या भागात एक रेस्टॉरंट सुद्धा होते. घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे ते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. शुभम चव्हाण याचा भाऊ आणि मित्र यांनी शपथ घेतली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेणार, असा निर्धार भावाने केला होता आणि या प्रकरणातील आरोपी मंदार केवळे तुरुंगातून बाहेर येताच त्याच्यावर सपासप वार करण्यात आले.








