कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास यांचा पासपोर्ट रेड फ्लॅग करण्यात आला असून त्यांना देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सौरव दास हे ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमासाठी आणि पॅनेल डिक्सशनसाठी जात असताना दिल्ली विमानतळावर त्यांना अडवण्यात आलं. त्यामुळे आता कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सौरव दास हा उच्चशिक्षित तरुण ऑक्सफोर्डमध्ये भाषण देण्यासाठी जात होता. मात्र त्याने नीरव मोदी किंवा विजय मल्ल्याप्रमाणे हजारो कोटींचे घोटाळे केले असते तर त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन देशाबाहेर जाऊ दिलं असतं, अशा शब्दात अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका केली.
अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर या मुद्द्यावरून टीका केली. ते म्हणाले की, मंगळवारी मध्यरात्री सौरव दास लंडनला जात होता. आमचे दिल्लीतील आंदोलन आणि त्याला मिळालेले यश याबाबत त्याचं ऑक्सफोर्ड विद्यापीठात लेक्चर होते. मग त्याला का थांबवण्यात आलं? तो गुन्हेगार आहे का?
हजारो कोटींचा घोटाळा केला असता तर…
सौरव दासचं एक चुकलं, त्याने हजारो कोटींचा घोटाळा करायला हवा होता. म्हणजे या सरकारने विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी आणि नीरव मोदीला ज्या पद्धतीने देशाबाहेर जाऊ दिलं त्या पद्धतीने यालाही व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन बाहेर सोडलं असतं, असा टोला यावेळी अभिजीत दिपके यांनी लगावला.
सौरव दास हा भारतातील कॉकरोच जनता पार्टीची चळवळ आणि आंदोलनाची माहिती परदेशात जाऊन तिथे देईल या भीतीने त्याला दिल्लीमध्येच अडवण्यात आल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. सौरव दास हा ऑक्सफोर्ड विद्यापीठात जाऊन महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगणार होता. पण केंद्र सरकारला हे नको आहे. केंद्र सरकारला चोर हवे आहेत, हे चोरांचं सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
सरकार कशाला घाबरतंय?
सौरवचा पासपोर्ट 2019 सालचा आहे आणि तो त्याला सरकारनेच दिला आहे. सौरव दोन वेळा परदेशात जाऊन आला आहे. त्याला परदेशातही प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळेच सरकारने हे कारस्थान रचलं आहे. या आधी सरकारला सौरवच्या पासपोर्टमध्ये त्रुटी दिसली नाही का? सरकारला इतकी भीती का आहे? सरकार कशाला घाबरतंय? असा सवाल अभिजीत दिपके यांनी विचारला.
या आधीही सरकारने दिल्ली आंदोलनाच्या वेळी आम्हाला विमानातून ताब्यात घेतलं होतं. सरकार आम्हाला घाबरत नाही असा दावा करते, मग आमच्या आंदोलनाच्या वेळी दिल्ली मेट्रो का बंद ठेवली, दिल्लीमध्ये आणिबाणी का लावली? असा सवाल अभिजीत दिपके यांनी केला.
सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या शाळेचा परवाना केंद्र सरकारने रद्द केला आहे. त्यावरूनही अभिजीत दिपके यांनी सरकारचा समाचार घेतला. सोनम वांगचुक यांना सरकारने त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवलं आहे. वांगचुक यांचे विचार जरी सरकारला पटत नसले तरी त्यांनी शाळेचा परवाना का रद्द केला? असा सवाल अभिजीत दिपके यांनी विचारला .
येत्या 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नागपुरात संविधान मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी युवकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन अभिजीत दिपके यांनी केलं आहे.








