सणासुदीचे दिवस आहेत. सणासुदीच्या दिवसात तुम्हीही मिठाई खरेदी करत असाल? आपल्या प्रियजनांना देत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळात मिळाई घेताना काळजी घेणे आता गरजेचे झालं आहे. कारण मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील मिठाईच्या दुकानातून नेलेली मिठाई खाल्ल्याने पाच जणांची प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचाही दावा कुटुंबियांनी केला आहे.
शेजाऱ्यांनी मिठाई दिली, 5 जणांची प्रकृती बिघडली!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील मिठाई दुकानातून 8 तारखेला एक ग्राहक मिठाई घेऊन गेला होता, त्यानंतर आजूबाजू ला राहणाऱ्यांनी मिठाई खाल्ल्यानंतर पाच जणांची प्रकृती बिघडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 35 वर्षीय जुबेर अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटनेनंतर मुंब्रा पोलीस आणि FDA पथकाने दुकानावर कारवाई करत मिठाईचे नमुने तपासणीसाठी घेतले असून मिठाईचे दुकान बंद करण्यात आले आहे. दरम्यान, मिठाई आणि मृत्यूचा संबंध अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नाही.
कुटुंबियांनी काय सांगितलं?
“ही मिठाई आमच्या शेजाऱ्यांकडून आम्हाला मिळाली होती. पाच जणांनी ही मिठाई खाल्ली होती, ज्यानंतर सर्वांना त्रास होऊ लागला. पाच जणांनी एक- एकच तुकडा खाल्ला होता. त्यांना तासाभराने उलटी. जुलाबाचा त्रास होऊ लागला. यापैकी चौघांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले होते. आम्ही एफडीएकडेही तक्रार दिली आहे,” त्यांनीही याबाबत योग्य तपास करु असं आश्वासन दिल्याचे मृत तरुणांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.
तसेच “झुबेर अन्सारी यांना मिठाई खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला. त्यांना उलट्या, जुलाब होऊ लागले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली होती. त्यांना डिस्चार्जही मिळणार होता. मात्रनंतर तिसऱ्या दिवशी त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती. त्यांचं लिव्हरही खराब होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे कुठेही रुग्णाला घेतले नाही, शेवटी आज त्यांचा मृत्यू झाला,” असं मृताच्या भावानने सांगितले.








