Search
Close this search box.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात घेतलेले निर्णय वादात अडकले. टॅरिफचा मुद्दा असो किंवा इराण विरोधातील युद्ध  या निर्णयामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुकीत मोठा फटका बसला. मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रेटसनं विजय मिळवला तर रिपब्लिकन पक्ष पिछाडीवर राहिला. या घडामोडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये काही बदल करण्याचे निर्णय घेतले. मात्र, आता रिपब्लिकन पार्टीमध्ये असंतोषाची ठिणगी पडलीय, पक्षातील काही जणांनी बंडाचा इशारा दिला आहे.

ट्रम्प यांच्या पक्षात नेमकं काय घडतंय?

मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची कामगिरी खराब झाल्यानंतर पक्षात असंतोष वाढू लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडलेल्या रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे अध्यक्ष जो ग्रूटर्स यांना हटवण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.

रिपब्लिकन राष्ट्रीय समितीत प्रत्येक राज्यातून निवडलेले 168 सदस्य आहेत. मध्यावधी निवडणुकीतील खराब कामगिरीनंतरही वॉशिंग्टनमधील बहुतांश रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आहेत. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय समितीतील काही नाराज नेत्यांचा गट जो ग्रूटर्स यांना हटवण्याची मागणी करतोय.

रिपब्लिकन पक्षातील बंडखोर गटानं केंटकीमधील केसी क्रॉस्बी यांचं समर्थन केलं आहे. जे सध्या रिपब्लिकन राष्ट्रीय समितीत दुसऱ्या स्थानावर आहेत. 3 नोव्हेंबरच्या निकालानंतर 5 नोव्हेंबरला पत्र लिहून क्रॉस्बी यांनी दावेदारी जाहीर केली होती. मध्यावधी निवडणुकीतील निकाल मोठा धक्का म्हटलं, झालेल्या चुकांबाबत प्रामाणिकपणे उत्तर द्यावं, असं देखील म्हटलं होतं.

क्रॉस्बी देखील ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन धोरणाचे पुरस्कर्ते आहेत. मात्र, विरोधक या प्रयत्नाला ट्रम्प यांच्या सत्तेला आव्हान मानत आहेत. टेनेसीतील समितीचे सदस्य ऑस्कर ब्रॉक यांनी देखील क्रॉस्बी यांचं समर्थन केलं आहे. आपलं काम व्यापक पातळीवर रिपब्लिकन उमेदवारांना विजयी करणं आहे. एका व्यक्तीला समर्थन करणं नाही, असं त्यांनी म्हटलं.

ब्रॉक यांनी नेतृत्त्वात बदलाची गरज असल्याचं म्हटलं कारण, रिपब्लिकन राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष जो ग्रूटर्स त्यांची जबाबदारी योग्यपणे पार पाडू शकले नाहीत. व्हर्जिनियाचे सदस्य पैट्टी लाइमॅन यांनी देखील टेक्सास, दक्षिण कॅरोलिना आणि मिसिसिपी यासारख्या बालेकिल्ल्यात पराभव झाल्यानंतर देखील जुन्या नेतृत्वाला कायम ठेवणं पक्षासाठी धोकादायक आणि अपमानास्पद असल्याचं म्हटलं. जानेवारीत अरिझोनामध्ये होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत क्रॉस्बी यांना नामांकन दाखल करण्यासाठी 10 राज्यातील 20 सदस्यांचा पाठिंबा लागतो.

ट्रम्प समर्थकांचा पलटवार

रिपब्लिकन पक्षात बंडाचे पडसाद उमटू लागल्यानं डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाइट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी नाराज आहेत. ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवर एक पोस्ट करत जो ग्रूटर्सला मेक अमेरिकन ग्रेट अगेन योद्धा म्हटलं आणि पूर्णपणे पाठिंबा दिला. बंडखोरांनी भूमिका बदलली नाही तर निधी संकलनासाठी केली जाणारी मदत बंद केली जाईल इसा इशारा देण्यात आला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें