अंधेरी ते वांद्रे मेट्रोच्या (मेट्रो २ बी) कामाला वेग आणल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला असला तरी त्यांच्यापुढे आता तीन गर्डर उभारण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अरुंद रस्ता, सततची वाहतूक, क्रेन उभारणीसाठी मर्यादित जागा आदी अडथळ्यांना पार करत हे गर्डर उभारावे लागणार आहेत. मेट्रो मार्गाचा हा टप्पा मार्च २०२७ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असले तरी उर्वरित कामांचा वेग, अडथळा ठरणारी बांधकामे अशी एकंदरित परिस्थिती पाहता प्रत्यक्ष सेवा पुढच्या पावसाळ्यापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
तीन गर्डर बसवणे बाकी
अंधेरी पश्चिम ते सारस्वत नगर या ७.५३ किलोमीटरच्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून. या मार्गावरील शेवटचे तीन गर्डर १८ नोव्हेंबरपर्यंत बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागरी बांधकाम आणि यंत्रणा उभारणीच्या कामांत आतापर्यंत ७५ टक्के प्रगती झाली आहे. मात्र जुहू सर्कल येथील ईएसआयसी मेट्रो स्थानकाजवळ गर्डर उभारणीचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरत आहे. येथे मेट्रोच्या दोन खांबांदरम्यान सुमारे १५० मीटर अंतरात पाच स्पॅनमध्ये एकूण २० प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट आय-गर्डर बसवण्यात येत आहेत. त्यापैकी १७ गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता तीन गर्डर बसवणे बाकी आहे.
गर्डर बसवण्याच्या कामात अडचणी
प्रत्येक गर्डरची लांबी ३३ मीटर, उंची १.२२ मीटर आणि रुंदी २.२५ मीटर आहे. एका गर्डरचे वजन सुमारे ११५ मेट्रिक टन असल्याने त्यांची उभारणी अत्यंत काळजीपूर्वक करावी लागत आहे. गुलमोहर रोडवरील अरुंद रस्ता, सततची वाहतूक, क्रेन उभारणीसाठी मर्यादित जागा आणि लगतच्या इमारती यांमुळे या कामात अडचणी येत आहेत. वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी गर्डर बसवण्याची कामे रात्रीच्या वेळी रस्ता बंद करून केली जात आहेत. या कामासाठी वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
१० किमीचा टप्पा २०२८ मध्ये
मेट्रो २बी मार्गावरील मंडाले ते चेंबूरदरम्यानचा सुमारे सहा किलोमीटरचा टप्पा आणि सहा स्थानके सध्या प्रवाशांसाठी खुली आहेत. सारस्वत नगर ते चेंबूर हा पुढील १०.०३ किलोमीटरचा टप्पा २०२८ मध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. याशिवाय मेट्रो २एचा दहिसर ते अंधेरी पश्चिम हा १८.६ किलोमीटरचा मार्ग आणि १७ स्थानके प्रवाशांच्या सेवेत आहेत.








