ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटून गेला असला तरी पोलीस अद्याप मास्टरमाईंडपर्यंत पोहोचू शकले नाहीत. प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पुर्णेकरांनी यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्यावर आता पूर्णेकरांच्या पुतणी खुशबू पुर्णेकरांनी पोलिसांना प्रश्न विचारला आहे. राज्याचे पोलीस जर एका गृहमंत्र्याला 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे यांना अटक का करू शकत नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला.
ठाण्यातील मानपाडा परिसरत 29 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचे पडसाद महिन्याभरानंतरही त्याच तीव्रतेने उमटत आहेत. महिना उलटूनही या प्रकरणातल्या मास्टरमाईंडपर्यंत पोलिस पोहचू न शकल्याने पूर्णेकरांचं कुटुंब आक्रमक झालं आहे. पूर्णकरांच्या प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली आहे. पण प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागचे सूत्रधार कोण, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळे आता या प्रकरणातला तपास, कुटुंबीयांचा आक्रोश आणि ठाण्यातलं राजकारण पुन्हा एकदा आमनेसामने आलं आहे.
मिनाक्षी शिंदेंना अटक का नाही?
प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणी खुशबू पु्र्णेकर म्हणाल्या की, “महाराष्ट्राचे पोलीस जर एका गृहमंत्र्यांला शंभर दिवस पोलीस कोठडीत ठेऊ शकतात तर मग राजा शिंदे आणि मीनाक्षी शिंदेला अटक का करू शकत नाहीत? पोलिसांना हवे तर ते काहीही करू शकतात. मग मीनाक्षी शिंदे हिच्यावर कोणाचा हात आहे?
आम्हाला हायकोर्ट 40 मिनिटांवर आहे, आम्ही हायकोर्टात जाऊ आणि सीबीआय चौकशीची मागणी करू. कारण ही SIT आम्हाला न्याय देणार नाही, अशा शब्दात खुशबू पूर्णेकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
राम पूर्णेकरांना ताब्यात घेतलं
वडिलांच्या न्याय मिळावा, या मागणीसाठी राम पूर्णेकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनासाठी गेले. पण आंदोलन करण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे, या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे चौकशीला हजर झाल्या. पण या घडामोडींच्या दरम्यान मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदेंच्या अटकेच्या मागणीसाठी नौपाडा पोलिस स्थानकात आणि ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्णेकर समर्थकांनी आंदोलन छेडलं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता कोणतं वळण मिळतं, याकडे लक्ष लागलं आहे.
राम पूर्णेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेसह मविआचे ठाण्यातले नेतेही आक्रमक झाले. राजन विचारेंसह अविनाश जाधव आणि केदार दिघेंनी नौपाडा पोलीस स्थानक गाठलं. पूर्णेकर कुटुंबासह राजकीय नेत्यांनीही हत्येच्या तपासावरुन पोलीस अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.








