ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 27 दिवस उलटल्यानंतरही या कटाच्या सूत्रधारांना अटक न झाल्यामुळे राम पूर्णेकर (Ram Purnekar) यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शुभ-दीप या निवासस्थानाबाहेर ठिय्या देण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असताना राम पूर्णेकर यांच्या भावनांचा बांध फुटला आणि त्यांना रडू कोसळले. तेव्हा पोलिसांनी रडणाऱ्या राम पूर्णेकर यांची कशीबशी समजूत काढत त्यांना रिक्षात कोंबून ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. राम पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ – दिप निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, या ठिय्या आंदोलनापूर्वीच वागळे इस्टेट पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले. (Thane Crime news)
राम पूर्णेकर हे रिक्षात बसायला तयार नव्हते. मात्र, पोलीस त्यांची समजूत काढत होते. राम माझं ऐक, रिक्षात बस, माझ्यावर विश्वास ठेव, असे एक पोलीस अधिकारी पूर्णेकर यांना सांगताना व्हिडीओत दिसत आहे. त्यावर राम पूर्णेकर यांनी म्हटले की, ‘माझे वडील गेलेत सर’… यानंतर राम पूर्णेकर हे मोठमोठ्याने रडत होते. पोलिसांनी आता राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले असले तरी त्यांना काहीवेळाने सोडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या सगळ्यामुळे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागील सूत्रधाराचा छडा लावण्यासाठीचा पोलिसांवरील आणि सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. उद्या ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये ठाण्यातील भाजपचे स्थानिक पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.
काही दिवासांपूर्वी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या फोनवरुन एकनाथ शिंदे यांच्याशी पूर्णेकर कुटुंबीयांचे बोलणे करुन दिले होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यावर एकनाथ शिंदे तातडीने त्याच्या घरी भेटीसाठी गेले होते. राम पूर्णेकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त करायला गेले होते. एकनाथ शिंदे यांना टायगर श्रॉफच्या घरी जायला वेळ आहे. मात्र, ठाण्यात असूनही ते आमच्या घरी आले नाहीत, असे राम पूर्णेकर यांनी म्हटले होते.
Meenakshi Shinde news: मिनाक्षी शिंदे पोलीस ठाण्यात चौकशीला पोहोचल्या
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना ठाणे गुन्हे शाखेने आज चौकशीला बोलावले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी एक वाजता मिनाक्षी शिंदे या ठाणे गुन्हे शाखेत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणावर फार बोलण्यास नकार दिला. मी यापूर्वीही सांगितलेले होते की, मला चौकशीला बोलावल्यावर मी चौकशीला सामोरे जाईल. मला आता चौकशीला बोलावलेले आहे. त्यामुळे मी चौकशीला आले आहे, पोलिसांना सहकार्य करेन, असे मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले.








