बंगालच्या उपसागरात निर्माण झालले अर्णब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकत आहे. हे वादळ ताशी 70 कि.मी. वेगाने पुढे जात असून, आंध्रच्या किनारपट्टीवर 28 ऑक्टोबरला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा सर्वाधिक परिणाम पूर्व विदर्भात होणार आहे. तसंच, राज्यातील इतरही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अर्णब चक्रीवादळामुळं 29 आणि 30 ऑक्टोबरला नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, मुंबईसह कोकणातही हलक्या सरी कोसळू शकतात, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या जिल्ह्यांत 30 आणि 31 ऑक्टोबरला पावसाच्या हलक्या सरी बरसतील.
महाराष्ट्राला ‘अर्णब’ चक्रीवादळाचा थेट धोका नसला तरीही मंगळवार ते गुरुवारपर्यंत राज्यातील काही भागांत पावसाचा प्रभाव राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात बुधवारी बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा तर मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
चक्रीवादळाचा परिणाम कोकणातही जाणवणार आहे. त्याचवेळी अरबी समुद्रातील हवामानातही बदल होण्याची शक्यता आहे. या दोन्ही घडामोडींमुळे हवेत ओलावा वाढेल. परिणामी, 30 आणि 31 ऑक्टोबरला मुंबई परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
अर्णब चक्रीवादळ भुवनेश्वर येथे बुधवारी धडकण्याची शक्यता असून पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा, आंध्र प्रदेशात शाळा बंद ठेवण्याच्या सूचना आहेत. हवामान खात्याने माहितीनुसार, हे चक्रीवादळ दुपारी ताशी 115-125 ते 140 किमी वेगाने आंध्र प्रदेशातून जाण्याची शक्यता आहे.
वायव्य दिशेकडे सरकत किनाऱ्याकडे येताना अर्णब चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. बुधवारी दुपारनंतर हे चक्रीवादळ बपतला आणि विशाखापट्टणमदरम्यान किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचे केंद्र अंदमान बेटांवरील विजयपूरमपासून 620 किमी वायव्येकडे, ओडिशातील गोपाळपूरपासून 580 किमी आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून 610 किमी अग्नेयकडे होते.








