बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील व सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ACB अंतर्गत दिलीप खेडकर यांची चौकशी सुरू होती. यावेळी चौकशीत त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा तब्बल 102 टक्के अधिक संपत्ती आढळल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.
दिलीप खेडकर यांच्याविरोधात साधारण 2014पासून चौकशी सुरू होती. तसंच, ACB कडून काल 10 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. दिलीप खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी मंगळवारी पहाटे लाचलुचपत विभागाने धाड टाकली. अधिकाऱ्यांनी घरातील कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. खेडकर यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 13 कोटी 30 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दिलीप व मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी कारवाई केली. 13 कोटी 30 लाखाच्या बेहिशोबी मालमत्ता आणि खर्चाबाबत चौकशी खेडकरांकडे करण्यात आली आहे.1995 ते 2023 या कालावधीतील उत्पन्न आणि मालमत्तेची चौकशी करण्यात आली आहे.
मंगळवारी पहाटे एकाच वेळी छापे टाकल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली. कारवाईसाठी 30 हून अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर पंढरीनाथ साबळे यांनी 2012 साली एसीबीकडे तक्रार केली होती. त्याच अनुषंगाने खेडकर यांच्या घरी पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे. तर या चौकशीत ज्ञात उत्पन्नाच्या 102 टक्के अधिकची बेहिशेबी मालमल्ला असल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तर दिलीप खेडकरांच्या नावावर अहिल्यानगर, पुणे, हवेली, पवई, बारामती, भालगाव, मुळशी, औंध, पनवेल, खरवंडी कासार, शिरूर कासार या ठिकाणी स्थावर मालमत्ता असल्याचे कागदपत्रे तपासली आहेत.
खेडकर हे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आहेत. कारवाईत अद्याप कोणालाही अटक नाही तर नेमकं घरातून काय जप्त केलें याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.








