आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमधील हॉस्टेलच्या खोलीत 22 वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडे याने 18 सप्टेंबर रोजी सीलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर एका नव्या वादाला तोंड फुटलेलं असून साहिलच्या आत्महत्येनंतर त्याला जातीयवाचक उल्लेख करुन त्रास दिला जातो होता असा आरोप करत पालकांनी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. आता विद्यार्थी आणि प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई झाल्याने संतापलेले प्राध्यापक असे दोन गट पडले आहेत. एकीकडे हा वाद आणि पोलीस तपास सुरु असतानाच दुसरीकडे आयआयटी प्रशासनाने साहिलच्या आत्महत्येनंतर एक मोठा निर्णय घेतला असून याचा परिणाम आता प्रत्येक खोलीत दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने धसका घेतला असून एक मोठा बदल होणार असल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियावर यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ वेगवेगळ्या दाव्यांसहीत व्हायरल होत आहेत. यावरच आता प्रशासनाने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. नेमका हा बदल काय आणि काय घडणार आहे जाणून घ्या सविस्तर…
काय बदल करणार?
साहिलने सीलिंग फॅनला लटकून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर आता आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमधील हॉस्टेलमध्ये सीलिंग फॅनऐवजी वॉल-माउंटेड फॅन बसविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हा निर्णय साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर तातडीने घेण्यात आला, अशी चर्चा असली तरी हॉस्टेलच्या नूतनीकरणाच्या कामाचा भाग म्हणून सीलिंग फैन बदलण्याचा विचार काही काळापासून सुरु होता, असा दावा प्रशासनाने केला आहे.
दोन महिन्यांपासून विचाराधीन
मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमधील सीलिंग फॅन बदलण्याचा मुद्दा काही काळापासून चर्चेत होता. ही प्रक्रिया सुमारे दोन महिन्यांपासून विचाराधीन होती आणि अलीकडे यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केलं होतं.
पहिल्या टप्प्यातील वॉल-माउंटेड फॅन कॅम्पसमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, 22 सप्टेंबर रोजी आयआयटी मुंबई प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रशासनाने फॅन बदलण्याच्या निर्णयाची अधिकृत माहिती स्पष्टपणे दिलेली नाही.
फोटोंबद्दलही शंका
सोशल मीडियावर साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटीमधील फॅन बदलले जाणार असं सांगत फिरत असलेल्या फॅनच्या फोटोंबद्दलही शंका असून हा फोटो आयआयटी मुंबई कॅम्पसमधीलच आहे की नाही, हे त्या वेळी स्पष्ट झाले नव्हते.
प्रशासनाचा पवित्रा काय आहे?
फॅन बदलणे हे हॉस्टेलमधील व्यापक नूतनीकरणाच्या कामाचा एक भाग असल्याचे आयआयटी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या कामाचा निर्णय विद्यार्थ्यांनी अलीकडच्या काळात केलेल्या आत्महत्यांशी जोडणं चुकीचं असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे ‘साहिल यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने सीलिंग फॅन हटविण्याचा निर्णय घेतला असे थेट सांगणे दिशाभूल करणारे ठरू शकते, असा पवित्रा आता प्रशासनाने घेतला आहे.








