मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, त्याचा परिणाम रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करावे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षित रेल्वे संचालनासाठी हे मेगाब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या काळात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुख्य मार्गावर कुठे आणि किती वेळ मेगाब्लॉक?
मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. या कालावधीत सीएसएमटीहून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. या लोकलना सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबा देण्यात येईल. मुलुंडनंतर या लोकल पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे त्या गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.
ठाण्याहून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल मुलुंडहून अप फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबतील. माटुंगा स्थानकानंतर त्या पुन्हा अप धीम्या मार्गावर धावतील आणि गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. याशिवाय सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या आणि सीएसएमटीला येणाऱ्या अप-डाऊन लोकल गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावरील लोकलवरही परिणाम
हार्बर मार्गावर सीएसएमटी–चुनाभट्टी–वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर चुनाभट्टी–वांद्रे–सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या कालावधीत मेगाब्लॉक असेल. सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ दरम्यान धावणाऱ्या डाऊन हार्बर लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. तसेच वांद्रे आणि गोरेगावच्या दिशेने सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत धावणाऱ्या डाऊन हार्बर लोकलही रद्द राहतील.
पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत धावणाऱ्या अप हार्बर लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गोरेगाव आणि वांद्रेहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेतील अप हार्बर लोकल फेऱ्यांवरही परिणाम होणार आहे.
वांद्रे-गोरेगावदरम्यान ‘शॅडो ब्लॉक’
पश्चिम रेल्वेकडूनही वांद्रे ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत शॅडो ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करता येणार
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रविवारी मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द होणार असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ राखून प्रवासाचे नियोजन करणे आणि रेल्वे प्रशासनाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.








