जवळपास चार वर्षांपूर्वी फुटलेला शिवसेना ठाकरे पक्ष आता पुन्हा फोडण्यात आला आहे. ठाकरेंकडील 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले असून त्यामध्ये धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश असल्याने शिवसेना ठाकरे गटासह शिवसैनिकांना सुद्धा धक्का बसला आहे. फुटलेल्या पाच खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा ओमराजे निंबाळकर यांचीच होत आहे.
विक्रमी मतांनी खासदार अन् 26 व्या वर्षी आमदार
ओमराजे निंबाळकर यांची आक्रमक भाषणे, त्यांनी मांडलेल्या भूमिका कायम शिवसैनिकांमध्ये चर्चेत होत्या. त्यांना 2024 मध्ये 3 लाख 29 हजार 886 मतांचे लीड मिळाले होते.ते पहिल्यांदा 2019 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यानंतर 2024 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. ओमराजे वयाच्या 26व्या वर्षी आमदार झाले होते. त्यांना जनतेमधून असणारा पाठिंबा, पक्ष, ठाकरे कुटुंबाप्रती स्नेह, फिटनेसमुळे लोकप्रियता मिळाली.
खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा
दुसरीकडे, शिंदेंच्या गळाला लागलेल्या खासदारांनी गट स्थापन केला असून त्याला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. यामध्ये ओमराजे यांच्यासह संजय दीना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव आणि संजय देशमुख यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आज (17 जून) गट स्थापन केल्याचे समोर आलं असलं तरी सहा खासदारांचे पत्र अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे त्यांनी सही केली आहे की नाही याबाबत स्पष्टता आलेली नाही.
पुण्यात माध्यमांना चुकवून कलटी मारली
दरम्यान, दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर ओमराजे पुणे विमानतळावर व्हीआयपी लाऊंजमध्ये तीन तास बसून होते. त्यानंतर त्यांनी स्वत:चे वाहन टाळत त्यांनी खासगी वाहने घरी जाणे पसंत केले. त्यामुळे बंडखोरी केली आहे, तर ते लपवाछपवी कशासाठी असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे, मतदारसंघात त्यांच्या बंडखोरीनंतर संतप्त भावना उमटल्या आहेत. काहींनी शेण फासण्याचा इशारा दिला आहे.
ओमराजे राजकारणात कसे आले?
ओमराजे यांचा राजकारणातील प्रवेश अतिशय कठीण परिस्थितीत झाला. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची मध्ये हत्या झाली. त्यानंतर अवघ्या 22-23 वर्षांचे असताना त्यांच्यावर कुटुंबाची आणि राजकीय वारशाची मोठी जबाबदारी आली. वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी जनतेमध्ये जाणे पसंत केले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा शिवसेनेकडून धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत संसद गाठली. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
‘उद्धव साहेबांनी मला पदरात घेतलं, मला सांभाळलं’
एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’वर आलेले ओमराजे नेहमीपेक्षा खूप वेगळे, भावूक पण तितकेच आक्रमक पाहायला मिळाले होते. ते म्हणाले होते की, ज्याचा बाप गेलाय तो रडेल नाही तर काय हसेल का? लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जी परिस्थिती मी आणि माझ्या कुटुंबाने अनुभवली, ती शब्दांत सांगता येणार नाही. पण मी कधीही रडत बसलो नाही. लोकांचे प्रेम आणि वडिलांचे आशीर्वाद पाठीशी होते, म्हणूनच मी आज इथपर्यंत उभा राहू शकलो. पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर या धाराशिवच्या जनतेने आणि उद्धव साहेबांनी मला पदरात घेतलं, मला सांभाळलं.








