रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ग्राहकांचं हित लक्षात घेत एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं मोगवीरा सहकारी बँक, मुंबईवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आरबीआयनं ही कारवाई मोगवीरा सहकारी बँक, मुंबईची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निर्बंध लादले आहेत. आरबीआयनं मे महिन्यात एका बँकेचा परवाना रद्द केला होता. रिझर्व्ह बँकेनं मोगवीरा सहकारी बँकेवर निर्बंध लादले असून खातेदारांना त्यांच्या खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येऊ शकते. या निर्बंधांची अंमलबजावणी 12 जूनला बँकेचं कामकाज संपल्यानंतर सुरु होणार आहे. हे निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असतील.
मोगवीरा सहकारी बँक लिमिटेडला यापुढे नव्यानं कर्ज मंजूर करता येणार नाहीत किंवा कर्जाचं पुनर्गठण करता येणार नाही. बँक कोणत्याही प्रकारची गुंतवणूक देखील करु शकणार नाही. नव्या ठेवी स्वीकारण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल.
आरबीआयनं त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार बँकेचं कामकाज सुधारण्यासाठी संचालक मंडळ आणि वरिष्ठ व्यवस्थापनासोबत संपर्क केला होता. मात्र, बँकेकडून कामकाज सुधारण्यासंदर्भात सकारात्मक आणि ठोस पावलं टाकण्यात आली नाहीत. यामुळं आरबीआयनं ग्राहकांचं हित लक्षात घेता कारवाई केली आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील फलटण येथील द यशवंत सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता.









