Search
Close this search box.

मान्सून लांबल्याने महाराष्ट्रात ‘पाणीबाणी’ची स्थिती… राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता 31 ऑगस्टपर्यंत…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 यंदाच्या वर्षी अपुऱ्या पर्जन्यमानाचा अंदाज आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पुढील तीन महिने फक्त पिण्यासाठीच वापरला जाणार आहे. सिंचनासाठी म्हणजेच शेतीसाठी धरणातील पाणी सोडणे बंद करा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. बरोबरच बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत कमी साठा शिल्लक

 

सरकारने पुढील तीन महिने म्हणजे 31ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. सिंचन भवनामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा, आगामी मान्सूनची परिस्थिती यासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील धरणांमध्ये आजघडीला फक्त 25 टक्केच साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत तो कमी आहे. पाऊस तुलनेने कमी झाल्याने धरणांमध्ये जलसाठा झाला नाही. यंदा मान्सून लांबल्याने आणि पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्याने आतापासूनच पाण्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

नाशिक, अहिल्यानगर, पुणे, मराठवाडा विभागातील जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची नवीन आवक सुरू होईपर्यंत असलेल्या पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा. मराठवाडा आणि कृष्णा खोरे महामंडळाच्या अंतर्गत येणारी सर्व धरणे, जलाशये व प्रमुख जलस्त्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा. त्यावर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा विचार करून पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक राखीव कोटा निश्चित करावा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. पाणी व्यवस्थापनाचा कृती आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देशही सर्व यंत्रणांना दिले आहेत.

राज्यातील धरणांमध्ये नेमकं किती पाणी शिल्लक आहे?

राज्यातील मोठे, मध्यम व लघु, अशा तीन हजार 28 प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ 24.74 टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्चात यंदा पाच टक्के घट आहे. त्यातच जून महिना अर्ध्यावर आला, तरी वरुण राजाने हजेरी लावली नाही. त्यामुळे 20 जिल्ह्यांतील साडेतीन हजार गावे, वाड्यांना अजूनही 1003 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाने हजेरी न लावल्यास टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोठे 138 प्रकल्प असून, त्यात केवळ 23.80 टक्के पाणी आहे. गतवर्षी पाण्याची स्थिती 28.78 इतकी होती. 264 मध्यम प्रकल्पात 30.52 टक्के जलसाठा असून, गतवर्षी मध्य प्रकल्पांमध्ये या कालावधीत 39.61 टक्के पाणी होते. लघु प्रकल्पांची संख्या दोन हजार ६२६ असून, पाणीसाठ्याची टक्केवारी 23.86 आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये 30.59 टक्के पाणी होते. एकूणच तापमानाचा पारा 42 ते 44 अंश सेल्सिअस इतका कायम असल्याने बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला आहे.

 
admin
Author: admin

और पढ़ें