ऑफिसमध्ये घुसून एका 29 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणी ऑफिसमध्ये आपल्या खुर्चीवर बसून काम करत असताना तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर तिथे पोहोचला आणि चाकूने वार करण्यास सुरुवात केली. आरोपीही त्याच ऑफिसमध्ये काम करत होती. 35 सेकंदात त्याने जवळपास 30 वेळा तिच्यावर चाकूने वार केले. गुरुवारी संध्याकाळी मोहालीमध्ये हा प्रकार घडला. फेज 11 मधील ‘एसआरपी लॉजिस्टिक्स लिमिटेड’च्या कार्यालयात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोपीने त्याच शस्त्राने स्वतःलाही जखमी करून घेतल्याचं समजत आहे. हा संपूर्ण हल्ला ऑफिसमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पीडितेचं नाव डिंपल असून, आरोपी हरविंदर उर्फ हॅरीही याच ऑफिसमध्ये काम करत होता. सीसीटीव्हीत दिसत आहे की, डिंपल आपल्या डेस्कवर असताना हरविंदर हातात चाकू घेऊन मागून येतो आणि हल्ला करतो. अचानक झालेल्या या हल्ल्याने डिंपल हादरते आणि जीव वाचवण्यासाठी धावू लागते. यानंतर तो तिला गेटजवळ पकडून पुन्हा हल्ला करतो. यावेळी इतर लोक तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही आरोपी थांबत नाही. यानंतर त्याने स्वत:च्या गळ्यावर चाकू फिरवून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण त्याला यश आलं नाही.
हत्येचा गुन्हा दाखल
दोघांनाही जखमी अवस्थेत फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे तरुणाला मृत जाहीर करण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं.
या घटनेला दुजोरा देताना एसएचओ (SHO) अमन बैदवान यांनी सांगितलं की, “ही घटना सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली आणि पोलीस 15 मिनिटांच्या आत घटनास्थळी पोहोचले. जखमी व्यक्तीला रुग्णालयात हलवण्यात आलं. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाला भेट देऊन जैविक आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. तसंच, घटनास्थळाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.”
तीन वर्षांची मैत्री आणि ब्रेकअप
मिळालेल्या माहितीनुसार, डिंपल आणि हरविंदर दोघेही तीन वर्षांपासून एकत्र काम करत होते. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं. काही काळापूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता. यामुळेच हरविंदर रागात होता आणि याच रागातून त्याने जीवघेणा हल्ला केला.
नातं सुधारण्याचा अयशस्वी प्रयत्न
ब्रेकअपनंतर हरविंदर मानसिकरित्या खचला होता असं समजत आहे. त्याने डिंपलसोबत नातं सुधारण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. यामुळेच तो फार त्रस्त होता.
या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तपासासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या सर्व माहितीची पडताळणी केली जात आहे. सध्याच्या टप्प्यावर एवढीच माहिती देता येईल. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
एसएचओ (SHO) यांनी सांगितले की, पीडित महिला आणि आरोपी हे दोघेही मूळचे पटियाला येथील रहिवासी आहेत. हरजिंदर सध्या मोहालीतील ‘पूरब अपार्टमेंट्स’मध्ये राहत आहे, तर त्याचे आई-वडील अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. प्राथमिक तपासाची माहिती देताना पोलीस म्हणाले, “डिंपल आणि हरजिंदर हे एकमेकांपासून सुमारे पाच फूट अंतरावर असलेल्या स्वतंत्र केबिन्समध्ये काम करत होते. हरजिंदर आपल्यासोबत चाकू घेऊन आला होता. प्राथमिकदृष्ट्या ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचे दिसून येते. महिलेने त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यावर त्याने चाकूने तिच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःलाही जखमी करून घेतले.”
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, तसेच फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांची प्रतीक्षा केली जात आहे.








