भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता (Rain In Maharashtra) व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या या अंदाजानंतर आता मुंबईतील मंत्रालयाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 तासांत मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाणे येथील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता मुंबईतील मंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे.
यवतमाळमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी- (Yavatmal Rain)
यवतमाळमध्येही दिवसभराच्या ढगाळी वातावरण अचानक बदल होऊन रात्री उशिरा अचानक वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. या अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली. काही भागात वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. दरम्यान, या वादळी वाऱ्याचा फटका फळपीक आंबा, उन्हाळी तीळ पिकांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परभणीत मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस- (Parbhani Rain)
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या परभणीत मध्यरात्रीच्या सुमारास आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट,सोबतच वादळी वाऱ्यांसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.अचानक बदललेल्या हवामानामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या परभणीकरांना काहीसा दिलासा मिळालाय.जोरदार वाऱ्यामुळे भागांत वीजपुरवठा खंडित झाला.ग्रामीण भागात या अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे.फळबागांसह भाजीपाला पिकांना या पावसाचा मोठा फटका बसू शकतो. सतत होत असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे यंदा गावरान आंब्याचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीमुळे गावरान आंबा खायला मिळतो की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, या वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी सूचना- (Maharashtra Weather)
विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.
प्रशासनासाठी उपाययोजना- (Maharashtra Weather)
ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात. हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.
विशेष सूचना- (Maharashtra Weather)
शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.








