Search
Close this search box.

धक्कादायक! बदलापुरात भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना धावला, ह्रदयविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भटक्या कुत्र्‍यांचा त्रास ही अनेक गावची आणि शहरांची समस्या आहे. पालिका प्रशासनाकडून हवी तेवढी खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांचा भटक्या कुत्र्‍यांनी चावा घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आता, बदलापुरातून (Badlapur) एक धक्कादायक घटना समोर आली असून भटक्या कुत्र्यांमुळे (dog) एका युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. भटक्या कुत्र्यांपासून बचाव करुन पळणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. एकीकडे बदलापूर नगरपालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आलीय.

हर्षल शिंदे असं तरुणाचं नाव असून तो आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरात मित्रांना सोडण्यासाठी गेला होता. याच दरम्यान एक महिला भटक्या कुत्र्यांना तिथे अन्न खाऊ घालत होती असं दिसून आलं. यावेळी तिथलाच एक भटका कुत्रा हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला. हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र, पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. हर्षलवर बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी, ह्रयविकाराच्या झटक्यानेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

हर्षलची 3 वर्षांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. कुत्र्याला घाबरून खूप जोरात पळाल्यामुळे हृदयावर ताण येऊन त्याला अटॅक आला, अशी माहिती समोर आली. मात्र, या संतापजनक प्रकारानं बदलापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पालिका प्रशासनानंही याची दखल घेत लवकरात लवकरत भटक्या कुत्र्यांच्या समस्येतून बदलापूरकरांची सुटका करू असं आश्वासन नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी दिलंय.

बदलापुरात 15 हजार भटकी कुत्रे

बदलापूर शहरात आज घडीला 15 हजार कुत्रे असल्याची माहिती समोर आली. कुत्र्यांच्या हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडतायेत. पालिकेनं डॉग शेल्टरच्या माध्यमातून उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी ही समस्या एका दिवसात सुटणं शक्य नाही. यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. मात्र, तोपर्यंत किती जणांना अशा घटनांना सामोरे जावे लागते असाच प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय.

admin
Author: admin

और पढ़ें