सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. 21 संचालक पदांपैकी 10 जागांवर महायुतीत फॉर्म्युला ठरला असून पाच जागा भाजप आणि राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी पाच जागा देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. उर्वरित 11 जागांवर निवडणूक पार पडणार आहे. त्याचा अनुषंगाने भाजप प्रमुख पदाधिकारी नेतेमंडळी यांची स्वतंत्र बैठक एका हॉटेलमध्ये झाली. दुसरीकडे दुसऱ्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये दहा वर्षांच्या कामकाजाच्या निकषामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार नितीन पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते अर्ज माघारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिग्गजांच्या माघारीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे .अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात साताऱ्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू लागले आहेत. या घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता लागलं आहे.
अनिल देसाई, राजेंद्र राजपुरेंना निवडणूक लढवता येणार नाही
दुसरीकडे, बँकेत सलग 10 वर्षे संचालक असल्याने उपाध्यक्ष अनिल देसाई आणि संचालक राजेंद्र राजपुरे यांचा उमेदवारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवैध ठरवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे देसाई आणि राजपुरे यांना आता जिल्हा बँकेची निवडणूक लढविता येणार नाही. देसाई यांचे नातेवाईक आणि राजपुरे यांच्या पत्नीचा अर्ज अजूनही निवडणुकीत असल्याने संचालकपद कुटुंबातच राहण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. 1 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज आज ( 21 ऑक्टोबर) मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीसाठी पुन्हा मैदानात उतरलेले उपाध्यक्ष अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे यांच्या संचालकपदाला सलग 10 वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत उभे राहता येणार नाही, अशी तक्रार कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली होती. यावर बेंचने दोघांबरोबरच राजेंद्र राजपुरे यांच्या पत्नी रुपाली राजपुरे यांचा अर्जही अवैध ठरवला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.








