दादारमधील एक प्रसिद्ध हॉल विकण्याची नामुष्की आली असून एका नामवंत बँकेच्या माध्यमातून हा हॉल विक्रीला काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा हॉल 100 वर्षांपेक्षा अधिक जुना असून हा एका समाजाच्या नावाने उभारण्यात आलेला हॉल असून समाजाचा मानबिंदू असलेल्या वास्तूवर ही वेळ आल्याने अस्वस्थता पसरली असून लिलावापासून ही वास्तू वाचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साडेआठ कोटींचं लोन
सीकेपी हॉलसंदर्भात हा सारा प्रकार घडलाय असून, 14 ऑक्टोबर रोजी या हॉलचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. पुनर्विकासासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अपयश आल्याने ठाणे भारत सहकारी बँकेने या संदर्भात प्रक्रिया सुरू केली. ठाणे भारत सहकारी बँकेकडून हॉलच्या पुनर्विकासासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. मात्र त्याची परतफेड करताना सीकेपी सभेच्या व्यवस्थापन मंडळाची दमछाक झाली.
35 कोटींना होणार लिलाव
बँकेच्या कर्जासोबतच मुंबई महापालिकेची अंदाजे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. केवळ 12 ते 13 कोटी रुपयांची देणी चुकवण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या आणि पुनर्विकासात अर्धवट उभी राहिलेली पाच मजली इमारत असलेल्या हॉलची किमान 35 कोटी रुपये राखीव किंमत ठरवून लिलाव पुकारण्यात आला आहे.
75 कोटी किंमत असताना 35 कोटींची किंमत?
अनेकांचे भावनिक व लग्नासारखे सोहळे या हॉलशी जोडलेले असल्याने लिलाव कसा टाळता येईल, असा प्रश्न सीकेपी समाजातील लोकांकडून उपस्थित केला जातोय. आठ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी 35 कोटींच्या संपूर्ण वास्तूचा लिलाव करण्याची गरज आहे का? त्यासाठी या वास्तूच्या एखाद्या मजल्याचा लिलाव करता आला नसता का? मुळात या वास्तूचे 34.81 कोटींचे बँकेने धरलेले किमान मूल्यांकन हे संशयास्पद असून ते किमान 75 कोटींच्या आसपास असू शकते असं अॅड. शिरीष देशपांडेंनी म्हटलं आहे.
ती जागा विकायला सभासदांनी होकार दिला असता तर…
सीकेपी सभेचे माजी अध्यक्ष अॅड. नचिकेत जयवंत यांनी, “आर्थिक गणिते विस्कटल्याने सीकेपी हॉलच्या लिलावाची वेळ आली आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. परंतु मार्ग निघाला नाही. ऑगस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत तळमजल्यावर जी बँक आहे. त्या बँकेसाठीच्या आरक्षित जागा विकण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र या प्रस्तावास सभासदांनी प्रतिसाद दिला नाही,” असं सांगितलं. ती जागा विकली गेली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती अशी भावनाही व्यक्त केली जात आहे.








