दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिकाकर्ते सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे या अत्यंत संवेदनशील दृष्टीनेच आम्ही या प्रकरणाकडे पाहत असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने तपासाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.
Disha Salian Death Case : एफआयआर दाखल करण्याचा पर्याय अद्यापही उपलब्ध
सुनावणीदरम्यान खंडपीठाने पोलिसांच्या कारभारावर बोट ठेवत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:
एफआयआर न नोंदवण्यावर आक्षेप: जर कोणी दखलपात्र तक्रार करत असेल, तर पोलिसांनी रीतसर एफआयआर (FIR) नोंदवून तपास करणे गरजेचे होते. प्राथमिक तपास करून गुन्हा निष्पन्न होतो की नाही हे स्पष्ट केले जाऊ शकले असते.
CrPC 174 तपासाच्या मर्यादा: गेले सहा वर्ष तुम्ही तपास करत आहात. मात्र, पोलीस केवळ CrPC 174 (अपघाती मृत्यू ADR) अंतर्गत तपास करत बसले आहेत. अशा तपासाला कायदेशीर मर्यादा असतात आणि त्याअंतर्गत नोंदवण्यात आलेल्या जबाबांना पुरावे म्हणून फारशी किंमत नसते.
तपासाच्या उपयुक्ततेवर प्रश्न: तुम्ही आजवर जो तपास केला तो व्यर्थ आहे का? तुम्ही आज त्यांना एप्रिल 2026 चा क्लोजर रिपोर्ट देत आहात, त्याला मुलीचे वडील आजही न्यायालयात आव्हान देऊ शकतात.”
एफआयआरचा पर्याय उपलब्ध: एफआयआर दाखल करून अधिकृत आणि वैधानिक तपास करण्याचा पर्याय अद्यापही पोलिसांकडे उपलब्ध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
High Court Perspective : राजकारणाशी संबंधित तक्रारीत रस नाही
उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, या प्रकरणात राजकारण्यांविरुद्ध केलेल्या तक्रारींविषयी किंवा राजकीय आरोपांमध्ये न्यायालयाला कोणताही रस नाही. एका हताश वडिलांच्या भावनेचा आणि न्यायाचा विचार करून या प्रकरणाचा एक कायदेशीर, वैधानिक आणि पारदर्शक तपास होऊन प्रकरणाची योग्य ती समाप्ती होणे आवश्यक आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Disha Salian Death Report : दिशा सालियन मृत्यू अहवालात काय?
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.








