पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला दहशतवादी हमजा बुरहान ची पाकिस्तानात हत्या झाली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी बुरहानवर गोळीबार केला. त्यात बुरहान मारला गेला. पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये बुरहानवर जीवघेणा हल्ला झाला. मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे. २०१९ मध्ये पुलवामात भारतीय जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यात ४० पेक्षा जवान शहीद झाले. दहशतवादी हमजा बुरहान पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडपैकी एक होता. शिक्षक अशी ओळख त्यानं तयार केली होती. शिक्षकी पेशाच्या आडून बुरहान दहशतवादी कारवाया केल्या होत्या.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामात भारतीय सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हमजा बुरहानवर मुजफ्फराबादमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडली. बुरहान पाकव्याप्त काश्मीरमधील त्याच्या कार्यालयात बसलेला असताना त्याच्यावर हल्ला झाला. बुरहानच्या कार्यालयात काही जण पोहोचले. त्यांनी हमजावर अनेक गोळ्या झाडल्या. या गोळीबारानं हमजाच्या शरीराची अक्षरश: चाळण झाली.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांमध्ये हमजाचा समावेश होता. तो स्वत:ची ओळख शिक्षक अशी सांगायचा. २०१९ नंतरही त्यानं अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सक्रिय भूमिका पार पाडली. तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण देत होता. सोबतच सीमावर्ती भागातून होणाऱ्या घुसखोरीत महत्त्वाची भूमिका पार पाडायचा. घुसखोरांना मदत करायचा. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं एअर स्ट्राईक केला. बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांचे म्होरके अज्ञात व्यक्तींकडून मारले जात आहेत. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीज (PICSS) आणि सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज (CRSS) यांच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा २११५ ते २५९७ च्या दरम्यान आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिझबुल मुजाहिद्दीन यांचे कमांडर, दहशतवादी अज्ञात हल्लेखोरांकडून मारले गेले आहेत.








