राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुंबईहून बारामतीला जाताना विमान अपघातात मृत्यू झाला होता. अजित पवार ज्या खासगी विमानातून प्रवास करत होते, ते विमान व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं होतं. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ते व्हीएसआर संदर्भात आक्रमक भूमिका घेत असतानाच खासदार पार्थ पवार यांनी मात्र मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी त्याच कंपनीच्या विमानाचा वापर केल्याचं समोर आलं आहे.
पार्थ पवार यांचा व्हीएसआरच्या विमानातून प्रवास
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर सातत्यानं व्हीएसआर व्हेंचर्स कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी व्हीएसआरच्या विमानांचा वापर टाळावा असं आवाहन देखील रोहित पवार यांनी केलं होतं. मात्र, त्यांचेच चुलत बंधू पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला आहे. पार्थ पवार यांनी व्हीएसआरच्या विमानातून मुंबई ते पुणे असा प्रवास केला आहे.
राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनी विमानातून प्रवास केल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हीएसआर कंपनी विरोधात रोहित पवार आरोप करत आहेत त्याचवेळी पार्थ पवार यांनी प्रवास केल्याचे समोर आले. पार्थ पवार शरद पवारांच्या घरी आयोजित स्नेह भोजनासाठी मुंबईहून पुण्याला गेले आहेत. जाताना त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा वापर केला आहे.
रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर डीजीसीएनं व्हीइसआर कंपनीची लिअर जेट प्रकारची ५ विमाने सरकारने ग्राउंड केली होती. जय पवार यांनी देखील ट्विट करत व्हीएसआर कंपनीच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. जय पवार यांनी पायलटच्या खूर्चीवर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या मालकाचा मुलगा झोपलेला असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.
एकीकडे अजित पवार यांच्याच कुटुंबातील व्यक्तीकडून कारवाई करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीचा विमानातून प्रवास केला आहे.
रोहित पवार आज व्हीएसआर बद्दल काय म्हणाले?
रोहित पवार यांनी आज देखील व्हीएसआरसंदर्भात काही आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या विमानातील पायलट आणि व्हीएसआर व्हेंचर्सचा वी.के. सिंग यांच्यातील काही संभाषणाचा दाखला देखील रोहित पवार यांनी आज दिला होता. तर, काही दिवसांपूर्वी व्हीएसआर व्हेंचर्सचं विमान दुबईला तांत्रिक बिघाडामुळं जाऊ शकलं, नव्हती, अशी पोस्ट देखील रोहित पवार यांनी केली होती.









