दहिसरमध्ये मनसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. राज्य सरकारने 1 मे महाराष्ट्र दिनापासून सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेत संभाषण करणं सक्तीचं केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचेच नेते प्रताप सरनाईक हे राज्याचे परिवहन मंत्री आहेत. असं असताना शिवसेनेतूनच त्यांच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाच्या विरोधात ते दहिसरमध्ये अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबत संवाद साधणार आहेत. दहिसरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण या कार्यक्रमात मनसे आणि संजय निरुपम यांचे समर्थक असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे पोलीस देखील सतर्क झाले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे.
संजय निरुपम यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांसोबत संवादचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पण त्यांच्या या कार्यक्रमाला मनसेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मनसे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येताना बघायला मिळत आहे. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. या घटनेमुळे दहिसर लिंक रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
संजय निरुपम काय म्हणाले?
“माझे मंत्री आहेत. मी त्यांच्याशी बोललो. त्यांना मी पत्र पाठवलं. त्यांना मी सांगितलं की, साहेब तुम्ही यावर पुनर्विचार करा. मी नक्की सांगतो. सर्व रिक्षाचालकांना सांगू इच्छितो की, तुमच्या मनातील भीती दूर करा. हे सरकार तुमचं आहे. सरकार तुमच्याप्रती संवेदनशील आहे. सरकार तुमची चिंता दूर करेल. तुम्हीदेखील सरकारचा आग्रह स्वीकारण्याचा प्रयत्न करा”, अशी भूमिका संजय निरुपम यांनी माध्यांना प्रतिक्रिया देताना मांडली.
मनसे आक्रमक, संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली
दुसरीकडे मनसे कार्यकर्ते यावेळी कार्यक्रमस्थळी आक्रमक झाले. त्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली. यावेळी प्रंचड गदारोळ झालेला बघायला मिळाला. पोलिसांनी यावेळी आंदोलनस्थळी घोषणाबाजी करणाऱ्या आणि संजय निरुपम यांच्या गाडीच्या पाठीमागे धावणाऱ्या काही आंदोलकांची धरपकडदेखील केलेली बघायला मिळाली.
मनसे कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय?
“गेल्या 25 वर्षांपासून हे लोकं मुंबईत रिक्षा चालवत आहेत, त्यांना मराठी येत नाही का? हा नियम आधीपासूनचा आहे. संजय निरुपम आता राजकारण का करत आहेत? संजय निरुपम राजकारण करत आहेत. रिक्षाचालक मराठी बोलायला तयार आहेत. ते आमच्याकडेही येत आहेत. आमच्या उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी स्टिकर लावलं आहे की, मला मराठी बोलता येतं. मी मराठी बोलणार. मग निरुपम का विरोध करत आहेत? संजय निरुपम यांचा विरोध असेल तर आम्ही त्यांना विरोध करणार. म्हणून आम्ही इथे जमलो आहोत”, अशी प्रतिक्रिया एका आंदोलक मनसे कार्यकर्त्याने माध्यमांना दिली.








