मिरा – भाईंदरकरांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या दहिसर – काशीगाव या मुंबई मेट्रो 9 मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. आता बुधवारी 8 एप्रिलपासून मिरा-भाईंदर ते मुंबई प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे.
मेट्रो 9 चा पहिल्या टप्प्यात एकूण चार मेट्रो स्टेशन सुरू आहेत. दहिसर पूर्व, पांडूरंग वाडी,मीरागाव आणि काशीगाव असे चार मेट्रो स्थानक असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चार मेट्रो स्थानकांसाठी 3 ते 12 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना 10 ते 20 रूपये इतकं तिकीट एका दिशेच्या प्रवासासाठी द्यावे लागणार आहे. तर रिटर्नसाठी 20 ते 40 रूपये इतकं तिकीट असणार आहे. दरम्यान मेट्रो 9 वरील दहिसर पूर्व हे मेट्रो स्थानक मार्गिका 9, 2 अ आणि 7 यांना जोडणारे एक महत्त्वाचे केंद्रस्थान मानले जात आहे. या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरवरून आता थेट अंधेरी पूर्व गाठता येणं सहज शक्य झालंय.
8 एप्रिलपासून मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल!
मेट्रो लाइन 9 आणि मेट्रो 2 ब या मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे 8 एप्रिल 2026 पासून मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
• लाईन 9 व लाईन 2बी 8 एप्रिलपासून सेवेत
• लाईन 7 आता काशिगावपर्यंत विस्तारित
• लाईन 2ए व लाईन 7 स्वतंत्र मार्गिका
• प्रत्येक मार्गिकेवर वाढीव फेऱ्या व सुधारित वारंवारता
• सोपे व समजण्यास सुलभ वेळापत्रक
अशी असेल मार्गिकानुसार सेवा
अ) मेट्रो लाईन 2ए (पिवळी लाईन) अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व
लाईन 2ए आता स्वतंत्र मार्गिका म्हणून कार्यरत राहील.
• पहिली गाडी : सकाळी सुमारे 5:50 – 5:55
• शेवटची गाडी: रात्री सुमारे 10:35 – 11:00
किती वेळानंतर एक मेट्रो येणार…
गर्दीच्या वेळेत: सुमारे 6 मिनिटे
इतर वेळेत: 8 ते 10 मिनिटे
• एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – 289, शनिवार – 231, रविवार – 213
ब) मेट्रो लाईन 7 व लाईन 9 (संयुक्त कॉरिडॉर) गुंदवली ते काशिगाव
लाईन 9 सुरू झाल्यानंतर लाईन 7 आता विस्तारित स्वरूपात कार्यरत राहणार आहे
• मार्ग लांबी: 19.79 किमी
• पहिली गाडी: सकाळी सुमारे 5:50
• शेवटची गाडी: रात्री सुमारे 11:00
किती वेळानंतर एक मेट्रो येणार…
गर्दीच्या वेळेत: सुमारे 5:50मिनिटे
इतर वेळेत: 8 ते 10 मिनिटे
• एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – 276, शनिवार – 223, रविवार – 205
या एकत्रित मार्गिकेमुळे अंधेरी पूर्व ते काशिगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होणार आहे.
क) मेट्रो लाईन 2बी (टप्पा 1) महाराष्ट्र नगर – मंडाळे ते देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन, चेंबूर
लाईन 2बी (टप्पा 1) मुळे हार्बर लाईन परिसराला मेट्रो जोडणी मिळाली आहे.
• मार्ग लांबी: 5.38 किमी
• पहिली गाडी : सकाळी 6:00
• शेवटची गाडी: रात्री सुमारे 10:15 – 10:30
• वारंवारता: सुमारे 9 मिनिटे 30 सेकंद
• एकूण फेऱ्या: 2029
हा कॉरिडॉर चेंबूर आणि आसपासच्या भागांना अखंड मेट्रो सुविधा प्रदान करतो, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांसाठी नवीन प्रवास पर्याय उपलब्ध होतात.
इंटरचेंज सुविधा
दहिसर स्थानकावरून प्रवासी लाईन 2ए आणि लाईन 7/9 दरम्यान सहज बदल करू शकतात, त्यासाठी स्टेशनबाहेर जाण्याची आवश्यकता तुम्हाला नसणार आहे.
प्रवाशांसाठी फायदे
• कमी प्रतीक्षा वेळ (6–10 मिनिटांत गाडी उपलब्ध)
• नव्या भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी
• अधिक जलद आणि थेट प्रवास
• सुलभ आणि समजण्यास सोपे वेळापत्रक









