राजस्थानमधील खाटू श्याम येथे दर्शनासाठी गेलेल्या धुळे जिल्ह्यातील भाविकांवर काळाने घाला घातला. राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या भीषण अपघातात शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील पवार कुटुंबातील तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अमराळे गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. मृतदेह गावात दाखल होताच नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर शोकमग्न वातावरणात पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नऊ जणांच्या मृत्यूने पवार कुटुंबाचा आधारच हरपला असून, अपघातातून सुदैवाने बचावलेल्या चिमुकल्याच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केल्यामुळे दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाला आधार मिळाला आहे.
कसा झाला अपघात
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात राहणारे पवार कुटुंबीय मध्य प्रदेश व राजस्थान राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन वेगवेगळ्या क्रूझर वाहनांतून ३६ जणांसह गेल्या मंगळवारी देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांनी उज्जैन, ओंकारेश्वर, पुष्कर, सालासर बालाजी यानंतर खाटूश्यामजी यांचे दर्शन घेतले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा ते परतीच्या प्रवासाला निघाले. क्रूझरमध्ये १६ प्रवासी बसले होते. ही गाडी कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभुपुरा गावाजवळ मध्यरात्री बाराच्या सुमारास पोहोचली असता, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली.
प्राथमिक तपासात वाहनचालकाला डुलकी लागल्यामुळे क्रूझरवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकमेकांचे नातेवाईक असून, एकाच कुटुंबातील सहा वर्षांच्या चिमुकलीसह चार जणांचा यामध्ये समावेश आहे.
नातेवाईकांचा आक्रोश
अपघातातील मृतदेह अमराळे गावात आणण्यात आल्यानंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह पाहताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. त्यानंतर शोकाकुल वातावरणात सर्व मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातील प्रत्येक व्यक्ती या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाली.
जयकुमार रावलांनी शिक्षणाची जबाबदारी उचलली
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अमराळे येथे उपस्थित राहून पवार कुटुंबीयांची भेट घेतली आणि या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या कठीण प्रसंगी आपण पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या दहा वर्षीय बालकाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत त्याला भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
“कुटुंबात दहा वर्षांचा जयेश आणि त्याचे चुलत आजोबा, असे दोघेच राहिले आहेत. त्यामुळे गावाने जबाबदारी घेऊन अंत्यविधी पार पाडले. पालकमंत्री या नात्याने मी त्याची शैक्षणिक, पालनपोषणाची जबाबदारी घेऊ इच्छितो. त्याच्या आईकडच्या नातेवाईकांशी बोलून निर्णय घेईन” असं रावल म्हणाले.








