‘सरके चुनर तेरी सरके’ (Sarke Chunri Teri Sarke Song Controversy) या KD Devil सिनेमातील (KD Devil Movie) गाण्यामुळे गेले काही दिवस बराच गदारोळ माजवलाय. या गाण्यातील आक्षेपार्ह कडव्यांमुळे ठिकठिकाणी होऊन या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी झाली. त्यानंतर हे गाणं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि YouTube वरूनही काढून टाकण्यात आलंय. अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्यावर हे गाणं शूट करण्यात आलंय. या गाण्यामुळे अभिनेत्री नोरा फतेही सध्या अडचणीत सापडली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, दहा वकिलांच्या एका ग्रुपनं गृह मंत्रालयाशी संपर्क साधून नोरा फतेहीचं वर्क परमिट रद्द करण्याची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी नोरा फतेहीला भारताबाहेर हाकलण्याची मागणी केली आहे. ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याच्या वादाला राष्ट्रीय महिला आयोगानं देखील गांभीर्यानं घेतलं आहे. मात्र, या प्रकरणी गाण्याचे गीतकार रकीब आलम यांनी मात्र हे सर्व प्रकरण दिग्दर्शकाच्या अंगी थोपलं आहे. त्यांच्या मते दिग्दर्शक प्रेम यांनी त्यांना कन्नड गाण्याचं शब्दशः भाषांतर करायला सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी तसंच ते हिंदीमध्ये बनवलंय.
मीडिया रिपोर्टनुसार, नोरा फतेहीविरुद्ध गृह मंत्रालयाकडेच नव्हे, तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण काहींचं म्हणणं आहे की, नोराविरुद्ध उचललेलं हे पाऊल थोडेफार संशयास्पद वाटतंय. कारण म्हणजे, नोराबाबत जितका गदारोळ माजला जात आहे, तितकासा गदारोळ चित्रपटाचे निर्माते किंवा अगदी त्याच गाण्यात झळकलेल्या संजय दत्तबाबत मात्र दिसून येत नाही.
“गाणं ‘अत्यंत अश्लील’, विशेषाधिकाराचा गैरवापर करणारं…” (Nora Fatehi Sarke Chunri Teri Sarke Song Controversy)
आपल्या याचिकेत, वकिलांनी आरोप केलाय की, सदर गाणं ‘अत्यंत अश्लील’ असून, लैंगिकदृष्ट्या उत्तेजक आहे, तसेच, ते सार्वजनिक नैतिकतेसाठी आणि महिलांच्या प्रतिष्ठेसाठीही अपमानकारक आहे. वकिलांनी युक्तिवाद केलाय की, अशा प्रकारच्या कंटेन्टवर काम केल्यामुळे, नोरा फतेहीनं तिला भारतात काम करण्यासाठी देण्यात आलेल्या विशेषाधिकाराचा गैरवापर केला आहे.
“परदेशी नागरिक कायदा’ आणि पासपोर्टचा संदर्भ (Nora Fatehi Work Permit In Trouble)
या याचिकेत, वकिलांनी ‘परदेशी नागरिक कायदा, 1946’ (Foreigners Act, 1946) मधील तरतुदींचाही संदर्भ दिला आहे. ज्या परदेशी नागरिकांचे काम सार्वजनिक सभ्यता किंवा सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकते, अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारकडे आहे असे त्यात नमूद केले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी ‘पासपोर्ट (भारतातील प्रवेश) कायदा, 1920’ आणि इतर संबंधित कायदेशीर तरतुदींचाही उल्लेख केला आहे.
भारतीय न्याय संहितेतील कलमांचा संदर्भ (KD Devil Movie
Song Controversy)
या याचिकेत पुढे असं नमूद करण्यात आलंय की, ‘सरके चुनर तेरी सरके’ हे गाणे अनेक कायद्यांचे उल्लंघन करते. यामध्ये भारतीय न्याय संहिता, ‘स्त्रियांचे अश्लील चित्रण अधिनियम, 1986’ आणि ‘माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000’ यांमधील विविध कलमांचा समावेश आहे. केवळ कायदेशीर चौकटीपुरते मर्यादित न राहता, वकिलांनी असा युक्तिवाद केला की, अशा प्रकारच्या चित्रणांमुळे अश्लीलता वाढीस लागते, स्त्रियांकडे केवळ एक वस्तू म्हणून पाहिले जाते आणि समाजात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या गैरसमजांना आणखी बळकटी मिळते.
मात्र या सर्व प्रकरणावर नोराने एक व्हिडिओ शेअर करुन स्पष्टीकरण दिलेले की तिला या गाण्याचे बोल माहित नव्हते. ते गाणे कन्नड व्हर्जनमध्ये शूट झाले. गाण्यासाठी तयार केलेल्या एआय फोटोसाठी सुद्धा तिची परवानगी घेतली नाही. मी जेव्हा हिंदी वर्जन ऐकले तेव्हा मला समजले की का इतकं ट्रोल होत आहे. मी दिग्दर्शकाला बोलले की हे बरोबर नाही, मी स्वत:ला यापासून वेगळे केले आहे. मी कधीच त्याचे प्रमोशन केले नाही. मी दिग्दर्शकाला हे देखील म्हटले की या गाण्यामुळे माझी इमेज दावणीला लागणार आहे.
संसदेतही गाजला मुद्दा, केंद्रीय मंत्र्यांनी घातली बंदी
‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत गेल्यामुळे गाण्याच्या निर्मात्यांना ते YouTube वरून काढून टाकावं लागलं. पुढे हा मुद्दा संसदेतही गाजला. बुधवारी, केंद्र सरकारनं या गाण्यावर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या निर्णयाची माहिती दिली.
स्पष्टीकरण देताना काय म्हणालेली नोरा फतेही? (Nora Fatehi On Sarke Chunri Teri Sarke Song Sontroversy)
गाण्यावरून झालेल्या वादानंतर नोराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत या विषयावर प्रतिक्रिया दिली होती. “मी मूळ कन्नड भाषेतील गाण्यावर डान्स केल्याने मला त्या गाण्याचे बोल माहीत नव्हते. नंतर निर्मात्यांनी ते हिंदीत भाषांतर करून तसंच प्रदर्शित केलं, ज्याबद्दल मला कोणतीच कल्पना नव्हती. मी हे गाणं तीन वर्षांपूर्वी चित्रित केलं होतं. तेव्हा मी त्याला होकार दिला होता, कारण तो एका मोठ्या चित्रपटाचा भाग होता आणि त्यात संजय दत्तचीही भूमिका होती. त्यामुळे अशा संधीला नाही म्हणणं मला योग्य वाटत नव्हतं. मला वाटलं होतं की हे गाणं ‘नायक नही खलनायक हूँ मै’चा रिमेक आहे. मला कन्नड भाषा समजत नाही, त्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्यावर मी विश्वास ठेवला. गाण्याच्या हिंदी डबिंगसाठी किंवा गाण्याचे बोल बदलण्यासाठी त्यांनी माझी परवानगी घेतली नव्हती”, असं स्पष्टीकरण नोरानं दिलं होतं.









